अमृता फडणवीस आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरण: 'त्या' महिलेची ५३ बनावट फेसबुक खाती असल्याचे उघड
By मनीषा म्हात्रे | Updated: September 14, 2022 19:29 IST2022-09-14T19:28:46+5:302022-09-14T19:29:00+5:30
गेल्या दोन वर्षांपासून ती महिला करते बनावट खात्यांआडून आक्षेपार्ह कमेंट्स

अमृता फडणवीस आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरण: 'त्या' महिलेची ५३ बनावट फेसबुक खाती असल्याचे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने ठाण्यातून स्मृती पांचाळ नावाच्या महिलेला अटक केली आहे. तपासात पांचाळ हिचे ५३ बनावट फेसबुक खाते आणि १२ जीमेल अकाउंट्स मिळून आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बनावट खात्यांआडून पांचाळ आक्षेपार्ह कमेंट करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्याकडे अधिक तपास सुरु आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांच्या नेतृत्तात हा तपास सुरु आहे. पांचाळ हिने ७ सप्टेंबर रोजी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्ट खाली आक्षेपार्ह कमेंट केली. एकापाठोपाठ एक चार पोस्ट केल्या. त्यातील मजकूर आक्षेपार्ह असल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी पांचाळला अटक केली आहे. न्यायालयाने तिला १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तांत्रिक तपासात पांचाळचे ५३ बनावट फेसबुक खाते, १२ जीमेल अकाउंट मिळून आले. तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तिने हे का केले? कुणाच्या सांगण्यावरून केले आहे का? बाबत सायबर पोलीस अधिक तपास करत आहे.