माणसातील सैतानाने बछड्यांनाही संपविले! बदला घेण्यासाठी वासराच्या मृतदेहावर विष टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 07:27 AM2021-01-03T07:27:07+5:302021-01-03T07:28:17+5:30

Crime News: कुणाच्याही मनाचा थरकाप उडावा अशी ही घटना उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या कऱ्हांडला बिटात घडली आहे. आपल्या मालकीच्या गाईचे वासरू वाघाने मारले म्हणून त्यावर विष टाकून वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा क्रूरपणे बळी घेण्याचा हा प्रकार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आला. या कृतीमुळे आपण आईसह मुलांचीही घोर हत्या करीत असल्याची भावनाही त्याला शिवली नाही, हे दु:खदच ! 

The devil in man killed the calves too! | माणसातील सैतानाने बछड्यांनाही संपविले! बदला घेण्यासाठी वासराच्या मृतदेहावर विष टाकले

माणसातील सैतानाने बछड्यांनाही संपविले! बदला घेण्यासाठी वासराच्या मृतदेहावर विष टाकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असा काय गुन्हा होता ‘तिचा’? पाच महिन्याची तीन लेकरं सांभाळत ‘ती’ उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या बिटात भटकत होती. शिकार करून जगणे आणि बछड्यांना शिकारीचे धडे देणे हा तर ‘तिचा’? धर्मच ! तो पाळला ही काय ‘तिची’ चूक? मुक्त अरण्यात जगणाऱ्या या जीवांना काय ठाऊक की जनावरांचीही मालकी असते! निसर्गनियमापोटी त्यांनी वासरू मारून खाल्ले, पण माणसातील सैतानाने विष टाकले; तिला अन्‌ तिच्या निष्पाप बछड्यांना संपविले !


कुणाच्याही मनाचा थरकाप उडावा अशी ही घटना उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या कऱ्हांडला बिटात घडली आहे. आपल्या मालकीच्या गाईचे वासरू वाघाने मारले म्हणून त्यावर विष टाकून वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा क्रूरपणे बळी घेण्याचा हा प्रकार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आला. या कृतीमुळे आपण आईसह मुलांचीही घोर हत्या करीत असल्याची भावनाही त्याला शिवली नाही, हे दु:खदच ! 


कऱ्हांडला बिटात १ जानेवारीला दुपारी वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले होते. जवळच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्यामुळे गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता व्यक्त होत होती. या चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू शनिवारी दाखल झाली. पुरावे गोळा करण्यासाठी संपूर्ण परिसर सील करून तपासणी करण्यात आली. या दरम्यान जवळच्या झुडपात तिसरा बछडाही मृतावस्थेत आढळला. कालपासूनच या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत होती. या घटनाक्रमात पुन्हा तिसरा बछडाही मृतावस्थेत सापडल्याचे कळताच वनविभागाच्या आणि वन्यजीवप्रेमींच्या मानवी संवेदना पुन्हा कळवळल्या. 


वरिष्ठांच्या उपस्थितीत शवविच्छेदन
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे हेमंत कामडी, सीडब्ल्यूएलडब्ल्यूचे प्रतिनिधी रोहित करू, बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल गवई आणि डॉ. चेतन पाथोड आणि सय्यद बिलाल व डॉ. प्रमोद सपाटे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृत वाघांना अग्नी देण्यात आला. 

विष टाकल्याची कबुली, गाय मालकास अटक 
n मृत वाघीण ४ ते ५ वर्षांची असून पाच महिन्यांच्या आपल्या तीन बछड्यांसह इथे वावरत होती. 
n नवेगाव (साधू) या गावातील दिवाकर दत्तूजी नागेकर (४०) याच्या गाईचे वासरू वाघाने मारले. त्यामुळे बदला घेण्याच्या भावनेतून आपण हे कृत्य केले. 
n वाघाने मारलेल्या गाईवर विष टाकल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
n ही घटना उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या कऱ्हांडला बिटात घडली आहे.

Web Title: The devil in man killed the calves too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ