स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा

By सूर्यकांत वाघमारे | Published: December 13, 2022 09:56 AM2022-12-13T09:56:51+5:302022-12-13T09:57:11+5:30

फसवी माहिती : नवी मुंबई, मुंबईतील भक्तांची फसवणूक

Devotees of Swami Samarth are the victim of cyber fraud | स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा

स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भक्तनिवासामध्ये बुकिंगच्या नावे गंडा घातला जात आहे. मागील एका महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये नवी मुंबईसह, मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाली आहे. इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाइन बुकिंग करणारे भक्त या सायबर गुन्हेगारांकडून नाडले जात आहेत.

घणसोली येथे राहणाऱ्या किरण पाटील यांच्यासोबत हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण राज्यात अशी ठकबाजी  सुरू असल्याचे निर्दशनास आले आहे. ते रविवारी अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणार होते. यासाठी शनिवारी रात्री ते भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय आहे का हे तपासात होते. यावेळी ऑनलाइन मिळालेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून त्यांनी फोनवरील व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे ११०० रुपये भरले होते. मात्र, रविवारी ते  भक्तनिवासात पोहचले असता, त्यांच्या नावे बुकिंग नसल्याचे सांगितले. बुकिंग केलेल्या नंबरची माहिती दिली असता, तो नंबर व्यवस्थापनाचा नव्हता.

रोज २५ जण जाळ्यात
अशाच प्रकारे दिवसाला २० ते २५ जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले. अखेर किरण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा मनस्ताप व भुर्दंड सहन करावा लागला. 

व्यवस्थापनाची पोलिसांत तक्रार
यासंदर्भात व्यवस्थापनाने अक्कलकोट पोलिसांकडे व सायबर पोलिसांकडेदेखील तक्रार केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत गुन्हेगार मोकाट असल्याने व इंटरनेटवर भक्तनिवासाच्या नावे फसवी माहिती पसरवली जात असल्याने भक्तांची फसवणूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक

गुन्हेगारांकडून भक्तांची उघड फसवणूक होत असतानाही व्यवस्थापन केवळ पोलिसांकडे तक्रार करून हात वर करत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मुंबईसह नवी मुंबई, पुणे येथून मोठ्या संख्येने भक्त जात असतात. त्यापैकी अनेकजण भक्त निवासामध्ये राहण्यासाठी ऑनलाइन बुकिंगला प्राधान्य देतात. 
लांबून येणाऱ्या भक्तांसाठी अल्पदरात निवासाची व्यवस्था म्हणून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्यामार्फत भक्तनिवास चालवले जात आहे. मात्र, त्यांचे कोणतेही अधिकृत संकेतस्थळ नाही. मात्र सायबर गुन्हेगारांनी बनावट संकेतस्थळ तयार केले असून त्यावर वेगवेगळे मोबाइल नंबर दिले आहेत. त्यावर संपर्क केल्यास भक्त निवासामध्ये बुकिंगसाठी आगाऊ पैसे भरण्यास सांगून प्रत्येकाकडून ८०० ते १२०० रुपये घेतले जातात.

Web Title: Devotees of Swami Samarth are the victim of cyber fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.