काशी विश्वनाथ मंदिराची बनावट वेबसाइट तयार करून भाविकांची फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 09:54 PM2024-07-19T21:54:39+5:302024-07-19T21:56:21+5:30
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशी ट्रस्टच्या सीईओंनी डीजीपीकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे.
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराची बनावट वेबसाइट तयार करून भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी दर्शन, आरती आणि रुद्राभिषेकाच्या नावाखाली भाविकांची १० लाख रुपयांपर्यंत फसवणूक केली आहे. ज्यावेळी भाविकांनी मंदिराशी संपर्क साधला, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशी ट्रस्टच्या सीईओंनी डीजीपीकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणात देश-विदेशातील भाविक काशी विश्वनाथ येथे दर्शनासाठी येत असतात. यादरम्यान, काशी विश्वनाथ मंदिराच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून सायबर गुन्हेगारांनी बुकिंग सुरू केले. यामध्ये रुद्राभिषेकसह दर्शन, पूजा, आरती बुक करण्यात आली होती.
सध्या मंदिराच्या मूळ संकेतस्थळावर श्रावणामुळे सर्व प्रकारची बुकिंग बंद आहे. फसवणूक करणाऱ्यांनी भाविकांना कळू नये, अशा पद्धतीने बनावट वेबसाइट तयार केली. वेबसाइटला भेट देणाऱ्यांना थेट संपर्काचा पर्याय देण्यात आला आहे. बनावट वेबसाईटवर भाविकांनी लॉग इन केल्यानंतर त्यांचा नंबर घेऊन आरोपींनी पैसे थेट आपल्या खात्यात जमा केले. तसेच, लिंकद्वारे नवीन ॲप सुद्धा अपलोड करत असल्याचे समोर आले.
याशिवाय फेक वेबसाइटवर क्लिक करताच होम पेज ओपन होईल. होम पेजवरील पूजा बुकिंगवर क्लिक करताच स्थानिक पंडित यांच्याशी संपर्क साधा असे लिहिले आहे. तसेच, ०९१-०९३३५४७१०१९/०९१९८३०२४७४ हे २ मोबाईल नंबरही देण्यात आले आहेत. फसवणूक करणारे पंडित यांच्या नंबरवरून ऑनलाइन पैसे मागवत होते.
मंदिराच्या सीईओकडून डीजीपींकडे तक्रार
मंदिराचे सीईओ विश्वभूषण मिश्रा यांनी डीजीपी प्रशांत कुमार आणि पोलिस आयुक्त मोहित अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये मंदिराची बनावट वेबसाईट डिलीट करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, वेबसाइटवर काशीमध्ये येताना दर्शनाव्यतिरिक्त हॉटेल, बोटी, टूर, ट्रॅव्हल, फ्लाइट आणि लोकल टॅक्सी यांचे बुकिंगही केले जात आहे. पहिल्याच क्लिकवर नंबर घेऊन एजंट ऑफलाइनही संपूर्ण माहिती देत आहेत.
यापूर्वी मंदिराचे फेसबुक पेज सुद्धा हॅक करण्यात आले होते
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी मंदिराचे फेसबुक पेज हॅकर्सनी हॅक केले होते. हॅकर्सनी पेजचा पासवर्ड बदलून स्टोरीमध्ये अश्लील पोस्ट्सही अपलोड केल्या होत्या. मात्र, आयटी टीमने पोस्ट हटवली आणि १ तासाच्या आत मंदिराचे फेसबुक पेज रिकव्हर केले होते.