'जय माता दी' हाच ठरला अखेरचा मेसेज; डिजीपींच्या हत्येनं पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:28 PM2022-10-04T15:28:23+5:302022-10-04T15:28:39+5:30
डीजीपी लोहिया त्यांचे मित्र संजीव खजूरिया यांच्या घरी सपत्नीक गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी घरातील नोकर यासिरला मसाज करण्यास सांगितले
जम्मू काश्मीरचे डीजीपी हेमंत कुमार लोहिया यांची सोमवारी गळा कापून हत्या करण्यात आली. आरोपीने काचेच्या बॉटलनं पोलीस अधिकाऱ्याचा खून केला. त्याचसोबत पोट आणि हातावर अनेक वार केले. या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना टीआरएफनं घेतली आहे. या घटनेसाठी डीजीपी लोहिया यांच्या सहकाऱ्यावर संशय आहे जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळताना दिसतो. डीजीपीचा फरार नोकर यासिर असं त्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डीजीपी लोहिया त्यांचे मित्र संजीव खजूरिया यांच्या घरी सपत्नीक गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी घरातील नोकर यासिरला मसाज करण्यास सांगितले. ते दोघे रुममध्ये गेले. काही वेळाने डीजीपा आवाज आल्यानंतर मित्र आणि कुटुंबीय धावत खोलीजवळ पोहचले. याठिकाणी दरवाजा बंद होता तो तोडून आतमध्ये पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात डीजीपी पडले होते. आरोपीने गळा चिरण्यासोबतच धारदार शस्त्राने शरीरावर अनेक वार केले होते.
हत्येनंतर आरोपीने कपड्यावर केरोसिन टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु खोलीचा दरवाजा उघडताच यासिर मागील दरवाज्याने पळून गेला. या प्रकरणी संजीव खजूरिया यांचा छोटा भाऊ राजू खजूरिया यांना ताब्यात घेण्यात आले. राजू खासगा सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. अत्यंत निर्दयी पद्धतीने लोहिया यांची हत्या करण्यात आली. या हत्येमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
संध्याकाळी ५ वाजता सर्वांना जय माता दी बोलले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास डीजीपी लोहिया यांनी त्यांच्या सर्व जवळच्या मित्र परिवाराला दुर्गा अष्टमी निमित्त जय माता दी असा व्हॉट्सअप मेसेज पाठवला. ३ दिवसांपूर्वीच ते जम्मूत परतले होते. हेमंत लोहिया हे एकमेव अधिकारी होते जे प्रत्येक अधिकाऱ्यांशी व्हॉट्सअप मेसेजद्वारे दररोज संपर्कात राहायचे. घटनेनंतर मित्र संजीव खजूरिया यांनी सर्वात आधी एडीजीपी मुकेश सिंह यांना फोन केला परंतु त्यांनी कट करत कामात व्यस्त असल्याचं कळवलं.