डीएचएफएलने सॉफ्टवेअर वापरून तयार केली १ लाख बनावट खाती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:50 AM2020-02-13T04:50:17+5:302020-02-13T04:50:34+5:30
ईडीच्या छापे; बनावट खात्यांत १२,७00 कोटी केले जमा
मुंबई : ‘दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन’ने (डीएचएफएल) खास बनवून घेतलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून १ लाख बनावट खाती तयार केल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या ताज्या धाडीतून समोर आले आहे.
सूत्रांनी सांगितले की, डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि त्यांच्या साथीदारांनी तब्बल १२,७00 कोटी रुपये कोणतेही रेकॉर्ड न ठेवता बनावट कंपन्यांना हस्तांतरित केले. त्यानंतर, त्यांनी खास तयार करून घेतलेल्या विशेष सॉफ्टवेअरमध्ये तपशील भरून बनावट खाती तयार केली. हीच खाती डीएचएफएलच्या रेकॉर्डमध्ये दाखविली गेली. या खातेधारकांना कर्ज देण्यात आल्याचे रेकॉर्डवर दाखविण्यात आले. अशा प्रकारे त्यांनी हस्तांतरित करण्यात आलेल्या रकमेचा हिशेब मिळवून देण्यात आला.
कंपनीचे विशेष सॉफ्टवेअर कसे काम करीत होते, याची माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, समजा डीएचएफएलच्या प्रवर्तकांना १ हजार कोटी रुपये बनावट कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित करायचे आहेत. त्यासाठी १ हजार कोटी रुपयांचा आकडा या सॉफ्टवेअरमध्ये दाखल केला जाईल. सॉफ्टवेअर या रकमेचे काही लाखांच्या रकमांत विभाजन करील. त्यानंतर, बनावट नावे आणि पत्ते वापरून हजारो खाती सिस्टीममध्ये तयार केली जातील. लाखांत विभाजित केलेल्या रकमा या खात्यांवर कर्ज थकबाकी म्हणून दाखविल्या जातील. यात प्रत्यक्ष कर्ज व्यवहार झालेलाच नसेल. रेकॉर्डवर मात्र थकबाकी दाखविली जाईल.
इक्बाल मिर्चीच्या गुन्ह्यातून उघड
सूत्रांनी सांगितले की, तपास टाळण्यासाठी व्यवहारांची विभागणी करणे मनी लाँड्रिंग कायद्यानुसार गुन्हा आहे. प्राप्त माहितीनुसार, वाधवान यांनी ७९ बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १२,७00 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. अमली पदार्थ तस्कर इकबाल मिर्चीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना वाधवान याचा घोटाळा समोर आला होता.