दारू पिऊन कुख्यात गुंडाचा तरुणीसोबत धिंगाणा, व्हिडीओ व्हायरल होताच केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 03:39 PM2020-10-23T15:39:41+5:302020-10-23T15:40:11+5:30
Crime News : पंधरा दिवसानंतरही या नामचिन गुंडावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही हे मात्र विशेष आहे.
औरंगाबाद - कुख्यात गुंड शेख जावेद शेख मकसूद उर्फ टिप्या हर्सूल जेलमधून सुटताच त्याच्या स्वागतासाठी शहरातील काही गुन्हेगार जेलबाहेर जमा झाले होते. इतक्यावरच न थांबता पुंडलिकनगर रोडवर कारच्या टपावर उभे राहून तरुणीसोबत बिअर पित आणि धूम्रपान करत नृत्य करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. पंधरा दिवसानंतरही या नामचिन गुंडावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही हे मात्र विशेष आहे. व्हिडिओ व्हायरल होताच टिप्याला पोलिसांनी अटक केली असल्याची ताजी माहिती मिळत आहे.
गेल्या वर्षी तुमच्या मुलाने मुलगी पळवून नेल्याचा आरोप करीत कुख्यात गुन्हेगार टिप्याने साथीदारासह महिलेच्या घरात धुडगूस घातला होता. कुटुंबाला मारहाण करत तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. हा प्रकार मध्यरात्री न्यायनगर भागात घडला. पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या मुलाची राजनगरमधून सुटका केली. या प्रकरणी चौघांना अटक केली होती. या प्रकरणी ४५ वर्षांच्या महिलेने तक्रार दाखल केली. ही महिला मोलकरीण असून पती, दोन मुले आणि मुलीसह न्यायनगरमध्ये राहते. रविवारी रात्री सव्वाबारा वाजता त्यांच्या घरात गुंड टिपू उर्फ शेख जावेद हा साथीदारासह शिरला. तुमच्या मुलाने आमची मुलगी पळवली असून ते कुठे आहेत, असे म्हणत सगळ्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. या सर्वांजवळ फायटर आणि चाकू होते. तसेच त्यांनी महिलेच्या मुलाचे अपहरण करत त्याला कारमधून घेऊन गेले. या प्रकरणी महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. एपीआय घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख आरेफ यांनी तातडीने कारचा शोध सुरू केला. ही कार कांचनवाडीत गेल्याचे त्यांना समजले, नंतर ती कार पुन्हा राजनगर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन भागात आली. यावेळी पाठलागावर असलेल्या पीएसआय शेख आणि पथकाने त्यांना अटक केली. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी टिप्या आणि तीन साथीदार पसार झाले होते.