वाहने चोरणाऱ्यास पोलिसांनी धुळ्यात केली अटक, ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
By अतुल जोशी | Published: March 1, 2023 05:35 PM2023-03-01T17:35:32+5:302023-03-01T17:35:58+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अतुल जोशी, धुळे: शहरासह अन्य भागातून चारचाकी व दुचाकी चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पकडले. त्याच्याजवळून दोन चारचाकी व एक दुचाकी असा एकूण ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. देवपुरातील त्रिमूर्ती सोसायटीतील रहिवासी अमृत अर्जुन पाटील यांच्या मालकीची घरासमोर लावलेले चारचाकी वाहन (क्र. एमएच १८ - व्ही ३०१९०) २१ फेब्रुवारी रोजी चोरीस गेले होते. या प्रकरणी देवपूर पोलिस स्टेशनला २५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतर्फेही सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना चाळीसगाव रोडवरील शाहरूख अब्बास खाटीक (वय २६, रा. जामचा मळा, धुळे) याने त्याच्या अन्य एका साथीदारासह चारचाकी वाहनाची चोरी केल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान, शाहरूख खाटीक हा चारचाकी वाहनासह चाळीसगाव रोड चौफुलीवर उभा असल्याची माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक हेमंत पाटील पथकासह तिकडे रवाना झाले. त्यावेळी शाहरूख खाटीक हा वाहनासह चाळीसगाव रोड चौफुलीवर उभा होता. त्यास ताब्यात घेतल्यावर त्याने अन्य ठिकाणी केेलेल्या वाहन चोरीची माहिती पोलिसांना दिली. धरणगाव (जि. धुळे) येथून चोरीस गेलेली स्कार्पिओ (क्र. एमएच ०६ - डब्ल्यू ६२०१) व दुचाकी (क्र. एमएच ४१ - एम २०१३) पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली. या तीनही वाहनांची एकूण किंमत ३ लाख ४० हजार रुपये एवढी आहे.