धुळे एलसीबीने रोखली गांजाची तस्करी, वृद्धाला बेड्या ठोकत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 04:06 PM2023-11-02T16:06:51+5:302023-11-02T16:07:00+5:30
या कारवाईत कारसह गांजा असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मुंबई - आग्रा महामार्गावरील अवधान गावानजीक सकाळच्या सुमारास सापळा रचून अवैधरीत्या होणारी गांजाची तस्करी रोखली. यावेळी सादर कारमधून गांजा घेवून जाणाऱ्या नगरच्या वृध्दाला देखील जेरबंद करण्यात धुळे एलसीबी ला यश आले आहे. या कारवाईत कारसह गांजा असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला.
धुळ्याहून मालेगावच्या दिशेकडे एक स्विफ्ट कारमधून (क्र. एमएच १४ डीझेड ८०५५) गांजाची 'अवैधपणे वाहतुक होणार असुन हे वाहन मुंबई-आग्रा धुळ्याकडुन मालेगावकडे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे प्राप्त होताच त्यांनी तत्काळ आपल्या पथकाला या वाहनाबाबत खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहाटेच्या सुमारास पथकाने सापळा लावुन मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत अवधान गावाजवळ धुळ्याकडुन मालेगावकडे जाणाऱ्या संशयीत कारला अडविले. चालकास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने मेहबुब आला. खान उसमान खान (वय ६२ रा. १२ इमाम कोटला घास गल्ली, अहमदनगर) असे सांगितले.
या दरम्यान पोलिसांनी स्विफ्ट कारची तपासणी केली असता त्यात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा मिळुन आला. ५१ हजार ५० रुपये किंमतीचा १० किलो २१० ग्रॅम वजनाचा गांजा व ३ लाखांची स्विफ्ट कार (क्र. एमएच १४ डीझेड ८०५५) असा एकुण ३ लाख ५१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर सदर इसमाविरोधत मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी दिली. ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोऊनी योगेश राऊत, पोउनि अमरजीत मोरे, असई शाम निकम, पोहवा संदीप पाटील, प्रकाश सोनार, पोना प्रशांत चौधरी, मायुस सोनवणे, चेतन बोरसे, पोलिस शिपाई कमलेश सुर्यवंशी, सागर शिर्के, योगेश साळवे, गुलाब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.