धाडसी दरोडा... हिरे, सोने, चांदी अन् २५ लाखांच्या रोकडसह ९२ लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 08:47 PM2023-01-16T20:47:02+5:302023-01-16T20:54:53+5:30

बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांचा शेगावात प्रताप

Diamonds, gold, silver, 92 lakh lumpas with cash of 25 lakhs | धाडसी दरोडा... हिरे, सोने, चांदी अन् २५ लाखांच्या रोकडसह ९२ लाख लंपास

धाडसी दरोडा... हिरे, सोने, चांदी अन् २५ लाखांच्या रोकडसह ९२ लाख लंपास

googlenewsNext

अनिल उंबरकर

शेगाव : बंद घराचा दरवाजा तोडून घरातील हिरे,सोने,चांदी, रोख २५ लाख रुपयांच्या रकमेसह एकूण ९२ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील मटकरी गल्लीतील रहिवासी आनंद पालडीवाल यांच्या निवासस्थानी घडली. घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले, मात्र कोणताही माग मिळाला नाही. आईची तब्येत बरी नसल्याने पालडीवाल कुटुंबीय उपचारासाठी जालना येथे गेले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी संधी साधली. ही बाब सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

सोमवारी सकाळी शेजाऱ्यांना पालडीवाल यांच्या घरातील वस्तूंबाबत शंका आल्याने त्यांनी ही माहिती घरमालकाला दिली. त्यानुसार आनंद पालडीवाल सोमवारी दुपारी शहरात आले. त्यांनी घरातील बाबींची पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये घरातील हिरे,१५०० ग्रँम (दीड किलो) सोने,दोन किलो चांदी तसेच रोख २५ लाख रुपये असे एकूण ९२ लाख रुपयांच्या मुद्देमाल चोरी गेल्याचे नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. मात्र,श्वान तेथेच घुटमळले कोणताही माग श्वानाने काढला नाही. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनीही तपासणी केली. पोलिसांनी पालडीवाल यांच्या घरासह शेजारच्या सीसीटीव्ही मधील फुटेजची पाहणी केली. घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी,ठाणेदार आनंद गोपाळ यांच्यासह पोलिसांचा ताफा ठाण मांडून आहे. रात्री उशिरापर्यंत शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- सीसीटीव्हीत दोघे कैद

पोलिसांनी पाहणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे जण रविवारी मध्यरात्री १ वाजेनंतर घरात प्रवेश करीत असल्याचे नोंद झाले आहे. तसेच इतरही शेजारच्या फुटेजची तपासणी पोलिस करीत आहेत. त्याद्वारे पोलिसांना सुगावा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Diamonds, gold, silver, 92 lakh lumpas with cash of 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.