आरोपींनी सुसाईड नोट नष्ट केली का? गुन्हे शाखा करणार तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 04:30 AM2019-06-06T04:30:53+5:302019-06-06T04:31:01+5:30
पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिघींच्या ताब्यासाठी उच्च न्यायालयात धाव
मुंबई : डॉ. पायल तडवी हीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती का? लिहिली असल्यास आरोपींनी ती नष्ट केली का? या अंगाने तपास करण्यासाठी गुन्हे शाखेला तिन्ही आरोपींचा ताबा हवा आहे. त्यासाठी गुन्हे शाखेने आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्याची विनंती उच्च न्यायालयाला याचिकेव्दारे केली आहे. केली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी आहे.
गेल्या शुक्रवारी विशेष न्यायालयाने आरोपी डॉक्टर हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. २२ मे रोजी पायल तडवीने तिच्या हॉस्टेलवर आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना आहुजा, मेहरे आणि खंडेलवाल यांना अटक केली. तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा या तिघींवर नोंदविण्यात आला आहे. जातीवाचक टिप्पणी करून या तिघींनी पायलचा छळ केल्याचा आरोप पायलच्या आईने केला आहे. त्यानंतर या तिघींवर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा व रॅगिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तडवीच्या आत्महत्याप्रकरणानंतर अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्याच दिवशी या प्रकरणाचा तपास गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे आरोपींची चौकशी करण्याची संधी मिळाली नाही, असे गुन्हे शाखेने याचिकेत म्हटले आहे.
विशेष न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्याच्या निर्णयाला विरोध करत गुन्हे शाखेने आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. अधिक चौकशी करण्यासाठी आरोपींचा ताबा हवा असल्याचे गुन्हे शाखेने याचिकेत म्हटले आहे.
आरोपींचा जामिनासाठी अर्ज
आहुजा, मेहरे आणि खंडेलवाल यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. विशेष न्यायालयाने या तिघींच्या जामीन अर्जावरील सुनावणी १० जून रोजी ठेवली आहे. तडवीवर आपण कधीही जातीवेचक टिपणी केली नाही. मुळातच तिची जात आपल्याला माहीत नव्हती, असे आरोपींनी जामीन अर्जात म्हटले आहे. तडवी दिलेले काम नीट करत नव्हती. त्यावरून तिची टर उडवायचो. तिचा छळ केला नाही, असा दावा आरोपींनी केला आहे.