मन हेलावून टाकणारी घटना; शौचास बसलेल्या चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:11 PM2021-06-24T22:11:47+5:302021-06-24T22:12:38+5:30

उघड्या डीपीच्या तारेला झाला स्पर्श, उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील घटना

Died of 3 years boy due to electric shock in Nagpur Umred | मन हेलावून टाकणारी घटना; शौचास बसलेल्या चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

मन हेलावून टाकणारी घटना; शौचास बसलेल्या चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

Next

उमरेड : शौचास बसलेल्या चिमुकल्याचा उघड्या विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श हाेऊन करुण अंत झाला. हृदय हेलावून टाकणारी ही घटना उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील बाजार चौकात गुुरुवारी (दि.२४) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

नैतिक पुजाराम बावणे (३ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मृत नैतिकचे वडील पुजाराम हे मासेमारीचा व्यवसाय करतात. गुरुवारी नैतिकची प्रकृती बिघडली. अशातच त्याला डॉ. टिकेश तेलरांधे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले. नैतिकचे वडील बाहेर गेल्याने आजी पुष्पा वाघधरे या आपल्या नातवासोबत होत्या. डॉ. तेलरांधे दवाखान्यात नसल्याने पुष्पा काही वेळ थांबल्या. अशातच नैतिकला शौचास जायचे होते. त्याला उघड्यावर बसविण्यात आले. नैतिक शौचास बसला असतानाच तेथे गाय आली. आजी पुष्पा यांनी गाईला हाकलण्यासाठी धाव घेतली. दुसरीकडे नैतिकही उठला. अशातच त्याचा लगतच्या उघड्या डीपीच्या तारांचा स्पर्श झाला आणि नैतिक जागीच कोसळला. पुष्पा यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. त्यासुद्धा यात जखमी झाल्या. लागलीच नैतिकला सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी नैतिकला मृत घोषित केले.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा
सिर्सी येथील वर्दळीच्या ठिकाणी ही विद्युत डीपी आहे. अनेकदा डीपीचे झाकण उघडेच असते. आजही अशीच परिस्थिती होती. शिवाय, विद्युत वायरसुद्धा अस्ताव्यस्त होते. शॉर्टसर्कीटसुद्धा नेहमीच होत असतात. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून, संबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल रोडे, प्रदीप चिंदमवार आदींनी केली आहे.

Web Title: Died of 3 years boy due to electric shock in Nagpur Umred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज