दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली 'डिजिटल अरेस्ट'; कोल्हापुरातील उद्योजकाला ८१ लाखांचा गंडा
By उद्धव गोडसे | Published: September 15, 2024 09:47 AM2024-09-15T09:47:01+5:302024-09-15T10:13:28+5:30
दहशतवादी समुहाला आर्थिक मदत केल्याची भीती घालत अज्ञातांनी ही लुबाडणूक केली. हा प्रकार ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडला.
कोल्हापूर : ऑनलाईन फसवणुकीचे रोज नवे प्रकार समोर येत असताना आता एनआयएचे (राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा) अधिकारी असल्याचे सांगत ऑनलाईन अटक करून उद्योजकाची ८१ लाखांची लूट केली. दहशतवादी समुहाला आर्थिक मदत केल्याची भीती घालत अज्ञातांनी ही लुबाडणूक केली. हा प्रकार ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडला. याबाबत उद्योजकाने शुक्रवारी (दि. १३) राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फसवणूक झालेले उद्योजक गोशिमाचे माजी अध्यक्ष आहेत.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील उद्योजकास ६ सप्टेंबरला व्हॉट्सॲप कॉल आला. एनआयएचे अधिकारी असल्याचे सांगत त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार एका गंभीर गुन्ह्यात तुम्हाला ऑनलाईन अटक केल्याचे सांगितले. 'हैदराबाद येथील एका व्यक्तीने दहशतवादी समुहाला १२२ कोटी रुपयांची मदत केली आहे. या पैशांमधून दहशतवाद्यांनी शस्त्रे खरेदी केली आहेत. या व्यवहारात तुमच्या बँक खात्यात २० ते २२ कोटी रुपये वर्ग झाले आहेत.
हा देशविरोधी गंभीर गुन्हा असल्याने एनआयएचे अधिकारी तुमच्या अवतीभवती वावरत आहेत. तुमच्यावर करडी नजर असून, कोणत्याही क्षणी ते तुम्हाला संपवू शकतात. तुमच्या जिवाला धोका असल्याने जवळच्या एका हॉटेलमध्ये जाऊन आमच्या ऑनलाईन अटकेत राहा,' असे सांगून त्याने उद्योजकास भीती घातली. जबरदस्तीने शिवाजी पार्क येथील एका हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले. त्यानंतर यातून सुटका करून घेण्यासाठी बँक खात्यावर ८१ लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करून घेतले.
भीतीपोटी उद्योजकाने त्यांच्या बँक खात्यातील ८१ लाख रुपये संशयिताच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर संशयितांचे फोन यायचे थांबल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.
थेट जीवे मारण्याची भीती
संबंधित उद्योजकाने हैदराबाद येथील व्यक्तीशी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. मात्र, थेट जिवे मारण्याची भीती घातल्याने ते संशयिताच्या सूचनांचे पालन करीत गेले. याच भीतीतून त्यांनी हॉटेलमध्ये स्वत:ला डांबून घेतले. आधार कार्ड, पॅन नंबर यासह इतरही महत्त्वाची माहिती संशयितांकडे असल्याने ते अधिकच घाबरले.