डिजिटल दान, राहा सावधान; क्राऊड फंडिंगच्या अनेक वेबसाईट निर्माण झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 10:13 AM2022-09-18T10:13:18+5:302022-09-18T10:13:55+5:30

अनेकवेळा दिलेल्या पैशांचे पुढे काय होते? याचा कुठलाही विचार दान देणारा नागरिक करत नाही.

Digital donation, beware; Many crowd funding websites have sprung up | डिजिटल दान, राहा सावधान; क्राऊड फंडिंगच्या अनेक वेबसाईट निर्माण झाल्या

डिजिटल दान, राहा सावधान; क्राऊड फंडिंगच्या अनेक वेबसाईट निर्माण झाल्या

Next

संतोष आंधळे

रीब रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराचा निधी उभा करता यावा, याकरिता काही क्राऊड फंडिंग वेबसाईट निर्माण झाल्या आहेत.  या वेबसाईटद्वारे रुग्णाचे रडवेले चेहरे आणि त्यांच्या उपचारासाठी मदतीच्या आवाहनाला अनेक जण त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत देऊन प्रतिसाद देत असतात. मदत करण्यासाठी कुठेही न जाता त्याच वेबसाईटवर दिलेल्या बँक अकाउंटवर डिजिटल पद्धतीने मदत जमा केली जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी या भावनेच्या बाजारात क्राऊड फंडिंगच्या नावाखाली घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने डिजिटल दान देताना सावधगिरी बाळगली पाहिजे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

अनेकवेळा दिलेल्या पैशांचे पुढे काय होते? याचा कुठलाही विचार दान देणारा नागरिक करत नाही. मात्र, क्राऊड फंडिंग वेबसाईटवरील कार्यपद्धतीच्या अनेक सुरस कथा चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्यावर सरकारी अंकुश गरजेचा असल्याचे  मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, काही वेळा आजाराचा खर्च असतो लाखभर आणि क्राऊड फंडिंग वेबसाईटवर आवाहन केलेले असते १० लाखांचे. काहीवेळा रुग्ण उपचार घेऊन मोकळा झालेला असतो आणि तरीही त्याच्या नावावर त्यानंतरही मदतीचे कॅम्पेन सुरू असल्याच्या घटना आढळून आल्याने क्राऊड फंडिंग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 

रुग्णालयाच्या बिलाच्या अंदाजपत्रकात खाडाखोड करून अतिरिक्त पैसे उकळण्याचे प्रकार समोर आले आहेत. रुग्ण काय माहिती देतोय किंवा रुग्णालय किती पैसे कोणत्या स्वरूपाच्या शस्त्रक्रियेला आकारतेय, यावर क्राऊड फंडिंग वेबसाईटच्या यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नसते. कुणी पण यावे मदत घेऊन जावे, एवढीच काय  ती या वेबसाईटची भूमिका आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तीची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. 

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेऊन गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची घोषणा तर केली आहे, मात्र ती प्रत्यक्षात येईल तेव्हाच खरे. गरिबांसाठी वैद्यकीय उपचाराचा खर्च उभारण्याचे चांगले काम करत असणाऱ्या या वेबसाईटची काळी बाजू लोकांसमोर आली आहे. त्यामुळे, आता अशा वैद्यकीय मदतीच्या आवाहनाला मदत करताना दोनदा विचार करावा लागणार आहे. मात्र यामध्ये गरजू रुग्णांची फरपट होऊ नये.

Web Title: Digital donation, beware; Many crowd funding websites have sprung up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.