शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट पुण्यात जेरबंद; ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी बीड पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:20 PM2018-08-25T12:20:59+5:302018-08-25T12:29:28+5:30
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट यास आज पहाटे बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यामुळे बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी १३ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल दहा गुन्ह्यांचा तपास सुलभ होणार आहे.
शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये ठेवीदारांच्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्यात शुभकल्याणच्या संचालकांविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल असून, गुंतवणूकदारांची जवळपास १३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर मराठवाड्यातील हा आकडा १०० कोटींच्या जवळपास आहे.
बीड जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. दरम्यान नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या २२ पैकी एक आरोपी शिवाजी भानुदास गिरी (लिपिक) यास आर्थिक गुुन्हे शाखेचे सपोनी विवेक पाटील यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी कळंब येथे अटक केली होती.
बीड तालुक्यातील वानगाव येथील मारुती बाबूराव जोगदंड या ठेवीदाराने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार जास्त व्याजाचे अमिष दाखवून फसवणूक करणे व एमपीआयडी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला होता. सुमारे २३ लाख २० हजार ४३० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २३ मार्च २०१८ रोजी २२ जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला होता. यात संचालकांसह लिपिक व कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता.आर्थिक गुन्हे शाखेने नेकनूरसह जिल्ह्यातील सर्वच प्रकरणांचा तपास सुरु केला होता. यातील एक आरोपी शिवाजी भानुदास गिरी याला दोन दिवसांपूर्वीच २३ आॅगस्ट रोजी कळंब येथे अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला.
दिलीप आपेट हा शंभू महादेव साखर कारखान्याचा चेअरमन आहे. विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या कारखान्याला आपला ऊस गाळपासाठी दिला होता. उसाचे बील न मिळाल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारखान्याचा लिलाव करण्याचे आदेश होते. या संदर्भाने दिलीप आपेट पुण्यातील न्यायालयात येणार होता. दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आले. आपेट याच्या अटकेबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उप अधीक्षक भास्करराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.