थेट पोलीस आयुक्तांकडून लकडावाला बंधूची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 07:16 PM2020-03-04T19:16:30+5:302020-03-04T19:25:07+5:30
गँगस्टर-पोलीस लागेबांधे प्रकरण, दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ
मुंबई - खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या गँगस्टर एजाज लकडावाला व त्याचा आतेभाऊ नदीम अब्दुल सत्तार यांच्याकडे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी कसून चौकशी केली. या टोळीची काही पोलीस अधिकारी व अंमलदाराशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्यानुषंगाने आयुक्तांनी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, नदीम सत्तार व सलीम महाराज यांच्या पोलीस कोठडीची मुदत अनुक्रमे १३ व ९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. नदीम हा शनिवारी दुबईहून परतल्यानंतर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विमानतळावर अटक केली.
बांधकाम व्यावसायिक, व्यापाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देवून खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी गँगस्टर एजाज लकडावाला त्याचे हस्तक परवीन तारीक, सलीम महाराज यांच्यावर आतापर्यंत शहर व उपनगरातील विविध ठिकाणचे एकुण ३० गुन्हे दाखल आहेत.त्यांच्यावर ‘मोक्का’तर्गंत कारवाई करण्यात आली असून फरारी असलेल्या नदीम अत्तारलाही शनिवारी अटक केली आहे. तिघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांचे मुंबईतील काही पोलीस अधिकारी व अंमलदाराशी निकटचे संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. बिल्डर, व्यापाऱ्यांना धमकावून रक्कम उकळण्यात त्यांचे सहकार्य मिळाले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे गँगस्टर-पोलिसांचे लागेबांधे असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी तपास अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आयुक्त पदाचा शनिवारी पदभार घेतलेल्या परमबीर सिंग यांनी या प्रकरणाची समूळ चौकशी केली जाणार असून कोणा पोलिसांचा त्यांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यास यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने शनिवारी लकडावाला बंधू व महाराज यांना त्यांच्यासमोर उभे करण्यात आले. सुमारे अर्धा तास त्यांनी तिघांकडे कसून चौकशी केली आहे. त्यांनी आतापर्यंत केलेले गुन्हे, त्यांचे अन्य साथीदार आदीबाबत सविस्तर विचारणा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या गुन्ह्याप्रकरणी प्रकरणी परवीन तारीक न्यायालयीन कोठडीत तर अन्य तिघे पोलीस कोठडीत आहेत. नदीम अत्तार व महाराज यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी नदीमला १३ तर महाराजला ९ मार्चपर्यंत कोठडीत मुदतवाढ मिळाल्याचे सांगण्यात आले.