बैद्यनाथ कंपनीच्या संचालकांची फसवणूक : ४० लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:26 AM2019-12-17T00:26:16+5:302019-12-17T00:27:22+5:30
मध्यभारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (रा. बैद्यनाथ हाऊस, चिडणीस मार्ग, सिव्हील लाईन) यांची त्यांच्याच संपर्कातील व्यक्तींनी तब्बल ४० लाखांनी फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यभारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (रा. बैद्यनाथ हाऊस, चिडणीस मार्ग, सिव्हील लाईन) यांची त्यांच्याच संपर्कातील व्यक्तींनी तब्बल ४० लाखांनी फसवणूक केली. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या बनवेगिरीचा भंडाफोड झाल्यानंतर शर्मा यांनी सोमवारी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिबब्रत सरत कानुगो, रिना सिबब्रत कानुगो (रा. विष्णूभवन टॉवर, आकाशवाणी चौक), प्रवीण मित्तल (रा. करिम लेआऊट, गोपाळनगर), विनय पुरुषोत्तम शर्मा आणि प्रियेशकुमार मिश्रा (रा. अपूर्वा टॉवर, सदर, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रणव शर्मा यांनी त्यांची व परिवारातील सदस्यांची बजाज अलायन्स लाईफ इंशोरन्स कंपनीची पॉलीसी काढली होती. ती अनावश्यक असल्यामुळे शर्मा यांनी त्यात गुंतविलेली रक्कम परत मिळावी म्हणून सिबब्रत कानुगोशी चर्चा केली. कानगोने त्यांना प्रारंभी पॉलिसीची रक्कम काढून देतो, अशी थाप मारली. नंतर पॉलीस सरेंडर करून बंद करण्यासाठी जास्त रक्कम लागेल, असे सांगितले. त्यानंतर २७ डिसेंबर २०११ पासून तो आजवर शर्मा यांच्या ग्रेट नाग रोड, बैद्यनाथ आयुर्वेदीक भवन प्रा.लि. च्या कार्यालयातून पॉलीसीचे चेक नेले. मात्र ती रक्कम (३९ लाख, ४८ हजार, ५०७ रुपयांचे डीडी) आरोपी प्रवीण मित्तल, विनय पुरुषोत्तम शर्मा, प्रियेशकुमार मिश्रा आणि रिना सिबब्रत कानुगो (रा. विष्णूभवन टॉवर, आकाशवाणी चौक) यांच्या खात्यात जमा केली. ही बनवेगिरी उघडकीस आल्यानंतर प्रणव शर्मा यांना त्यांची ३९ लाख, ४८ हजार, ५०७ रुपयांनी फसवणूक झाल्याचे आणि या फसवणूकीत कानुगोसोबतच उपरोक्त सर्व आरोपी सहभागी असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे शर्मा यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४२० (ब), ४०६ आणि ४०९ अन्वये सोमवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.