'डॉन' बनायला गेले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले; आता हॉटेलात घासताहेत भांडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:25 PM2022-02-08T17:25:54+5:302022-02-08T17:33:04+5:30
ज्या हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवून लुटायला गेलेल्या या चौघांची पोलिसांनी धिंड तर काढलीच पण त्याच हॉटेलात जाऊन खरखटी भांडी घासायला लावून त्यांचा सारा माज उतरवला आहे.
चाकूचा धाक दाखवून 'डॉन' बनायला गेलेल्या चार गावगुंडांची पोलिसांनी चांगलीच मस्ती उतरवली आहे. ज्या हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवून लुटायला गेलेल्या या चौघांची पोलिसांनी धिंड तर काढलीच पण त्याच हॉटेलात जाऊन खरखटी भांडी घासायला लावून त्यांचा सारा माज उतरवला आहे. चारही भामट्यांनी हॉटेल मालकाची माफी देखील मागितली. इंदौरच्या खजराना येथे हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
सहा दिवसांपूर्वी इंदौरच्या खजराना येथील हॉटेलात चार उद्धट ग्राहकांनी थंड रोटी दिल्यामुळे राडा सुरू केला. चाकूचा धाक दाखवून हॉटेलच्या मालकाला धमकावलं. संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चौघांना शोधून काढलं आणि त्यांची 'भाई'गिरी उतरवली. खजराना येथील जमजम चौकातील 'खाना खजाना' नावाच्या हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला होता. रफीक परदेशी उर्फ पाऊडर याच्यासोबत त्याचे तीन मित्र यात सामील होते. यात एक छोटू उर्फ फरीद आणि आसिफसोबत एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश होता. थंड झालेली रोटी देण्यात आल्यानं चौघांनी हॉटेलमध्ये हंगामा केला. त्यातील एकानं हॉटेलच्या मालकाचा चाकूचा धाक दाखवून धमकावलं आणि बिल न भरताच ते निघून गेले होते.
हॉटेलच्या मालकानं संपूर्ण प्रकराची पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करत चौघांचाही शोध लावला आणि त्यांना पकडून पायी चालत त्याच हॉटेलपर्यंत नेलं. त्यानंतर सर्वांसमोर कान पकडून जोरबैठका मारायला लावल्या. तसंच हॉटेलचं बिल दिलं नाही म्हणून खरकटी भांडी देखील घासण्याची शिक्षा दिली. त्यानंतर चारही आरोपींनी हॉटेल मालकाची माफी मागितली आणि पुन्हा असा प्रकार घडणार असं आश्वासन दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील रफीक परदेशी याच्यावर आधीच एका गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे त्याची 'भाई'गिरी उतरवण्यासाठी असं करण्यात आल्याचं ते म्हणाले.