नरेंद्र गिरी महाराज मृत्यूप्रकरणी शिष्य आनंद गिरी याला अटक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याची शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:18 AM2021-09-22T09:18:00+5:302021-09-22T09:21:53+5:30
आनंद गिरीबरोबर हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी व मुलगा संदीप यांना पोलिसांनी अटक केली. आनंद गिरीविषयी अनेक तक्रारी असल्याचे सांगण्यात येते.
प्रयागराज : अ. भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराजांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या संशयावरून पोलिसांनी शिष्य आनंद गिरी व अन्य दोघांना अटक केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक ओ. पी. पांडे आणि भाजप व समाजवादी पक्ष यांच्या स्थानिक नेत्यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत.
महंत नरेंद्र गिरी यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिक आज बाघंबरी मठात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक राजकीय व धार्मिक नेते आणि संत, महंत व साधूंनी त्यांचे दर्शन घेतले.
शिष्य कायमच वादात
आनंद गिरीबरोबर हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी व मुलगा संदीप यांना पोलिसांनी अटक केली. आनंद गिरीविषयी अनेक तक्रारी असल्याचे सांगण्यात येते. तो महाराजांचा मानसिक छळ करीत असे, त्याने मठाची जमीन हडपली होती, ऑस्ट्रेलियात त्याने महिला शिष्यांना मारहाण केली होती, आपण महाराजांचे उत्तराधिकारी असल्याची घोषणा त्याने केली होती, अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. मद्याचा ग्लास समोर ठेवून ते बसल्याचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते.