नागपूरच्या काछीपुऱ्यातील हत्याकांडाचा उलगडा : दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:10 PM2020-01-27T23:10:39+5:302020-01-27T23:12:09+5:30
काछीपुऱ्यातील हरीश पटेल हत्याकांडाचा उलगडा करून बजाजनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. आपसी वैमनस्य आणि अनैतिक संबंधात झालेला अडसर यातून हे हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काछीपुऱ्यातील हरीश पटेल हत्याकांडाचा उलगडा करून बजाजनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. रामानुज चित्रसेन पटेल (वय ३५, रा. काचीपुरा) आणि भोला उग्रसेन पटेल (वय ४२, रा. रिवा, मध्य प्रदेश), अशी आरोपींची नावे आहेत. रामानुज हा हरीशचा जावई आहे. आपसी वैमनस्य आणि अनैतिक संबंधात झालेला अडसर यातून हे हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.
हरीश पटेल याने १० वर्षांपूर्वी योगेश पट्टा नामक तरुणाची हत्या केली होती. बहिणीशी योगेशचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याच्या कारणावरून हरीशने ही हत्या केली होती. त्या हत्याकांडातून दोषमुक्त झाल्यानंतर त्याने शंकरनगर चौकात चायनीजचा हातठेला सुरू केला होता. आरोपी रामानुज पटेल हा हरीशच्या वडिलांच्या दुकानात कामाला होता. दरम्यान हरीशच्या बहिणीशी त्याचे सूत जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे हरीश रामानुजवर चिडून होता. यामुळे दोघात अनेकदा वादही झाले होते. दुसरा आरोपी भोला पटेल १५ वर्षांपूर्वी काछीपुऱ्यात राहायला आला होता, नंतर तो निघून गेला. सध्या तो मध्य प्रदेशातील रिवा येथे राहतो. अधूनमधून तो काछीपुऱ्यातील त्याच्या चुलत भावांकडे येतो. हरीशचा भोलावरही राग होता. तो त्याला वस्तीत येण्यास मनाई करीत होता. काही दिवसांपूर्वीच हरीश भोलाच्या मागे चाकू घेऊन धावला होता. हरीशची पत्नी रामानुजसोबत नेहमीच हसतखेळत बोलत होती. बायकोची रामानुजसोबत असलेली मैत्री हरीशला खटकत होती. या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशयही हरीशला होता. त्यामुळे हरीशने बायकोशी अनेकदा रामानुजचे नाव घेत भांडणही केले होते. तिने रामानुजला हे सांगितले होते. आपल्या मैत्रीत हरीश अडसर ठरत असल्याने त्याचा पत्ता कट करण्याची संधी रामानुज शोधत होता.
तीन दिवसांपासून रेकी
भोलासोबत हरीशचे अनेकदा खटके उडाल्याची माहिती रामानुजला होती. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी भोलाची भेट घेतली. त्याच्याजवळ हरीशचा गेम करण्याचा इरादा त्याला बोलून दाखवला. भोलाने तयारी दर्शविताच या दोघांनी हरीशची तीन दिवसांपासून रेकी केली. तो कधी येतो, कसा येतो, त्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी घात लावला. शुक्रवारी मध्यरात्री दारूच्या नशेत हरीश घराकडे येत असल्याचे पाहून आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घातला, नंतर भोलाने हरीशचा चाकूने गळा कापून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि दोघेही पळून गेले. हे हत्याकांड उजेडात आल्यानंतर पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. संशयावरून शनिवारी सायंकाळी भोलाला आणि नंतर रामानुजला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला.