नीट प्रकरणी माेबाईलमध्ये अनेकांशी व्यवहार केल्याचं उघड; CBI अधिकाऱ्यांची माहिती
By राजकुमार जोंधळे | Published: July 3, 2024 05:20 AM2024-07-03T05:20:54+5:302024-07-03T05:21:20+5:30
हे प्रकरण देशभर गाजत असून, यातील काही आराेपी अद्यापही हाती लागले नाहीत.
लातूर - नीट गुणवाढसंदर्भाने लातुरात दाखल गुन्ह्यातील चारपैकी दाेघांना पाेलिसांनी अटक करुन प्राथमिक तपास केला आहे. त्यांच्याकडून ताब्यात घेतलेले कागदत्र, माेबाईल ‘डेटा’मधून आराेपींनी अनेकांशी आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी मंगळवारी लातूर न्यायालयाला दिली. आता या गुन्ह्याशी संबंधित तपशील सीबीआय जमा करणार आहे. यातून नीट प्रकरणाचे नेटवर्क आणि त्याची व्याप्ती समाेर येणार आहे.
नीट प्रकरणाचे धागेदाेरे देशातील काही राज्यात असल्याची माहिती समाेर आल्यानंतर सीबीआयने हा तपास हाती घेतला. लातुरातील नीट प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे रविवारी वर्ग झाला आहे. लातूर पाेलिसांकडून साेमवारी दिवसभर आराेपींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. स्थानिक तपास यंत्रणांकडून सर्व कागदपत्रे, इतर जप्त मुद्देमाल लातूर पाेलिसांनी सीबीआयकडे द्यावा, असा आदेश लातूर न्यायालयाने दिला हाेता. दरम्यान, तपास केलेल्या सर्वच कागदपत्रांची वर्गवारी करण्यात आली आहे. सीबीआयने आराेपींचा साेमवारी रात्रीच ताबा घेतला आहे.
हे प्रकरण देशभर गाजत असून, यातील काही आराेपी अद्यापही हाती लागले नाहीत. अटकेतील आराेपींच्या माेबाईलमधून अनेक लाेकांशी आर्थिक व्यवहार झाल्याचा संदर्भ समाेर आला आहे. आराेपींनी स्वत:बराेबरच इतर नातेवाईकांच्या नावावर काही आर्थिक व्यवहार केले आहेत. याचा तपास, सर्व तपशील सीबीआयकडून जमा करण्यात येणार आहे.
इतर परीक्षांचीही प्रवेशपत्रे आढळली
नीटशिवाय इतर परिक्षांची प्रवेशपत्रे आराेपींच्या व्हाॅटस्अॅपमध्ये आढळून आली आहेत. त्याचाही तपास आता सीबीआय करणार आहे. लातुरातील आराेपींच्या संपर्कात काेण-काेण आले आहे. याचा शाेध घेत हे ‘कनेक्शन’ इतर किती जिल्ह्यात पाेहचले आहे. याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली.