"सुख म्हणजे नक्की काय असतं" या मालिकेत भगवान गौतम बुद्धांची विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 20:30 IST2021-09-15T20:24:28+5:302021-09-15T20:30:04+5:30
Thane News : रिपाइं एकतावादीचा आंदोलनाचा इशारा

"सुख म्हणजे नक्की काय असतं" या मालिकेत भगवान गौतम बुद्धांची विटंबना
ठाणे: एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीवर सुरु असलेल्या एका माालिकेमध्ये भगवान गौतम बुद्धांचा कथित अवमान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित वाहिनीचे संचालक, निर्माते आणि ड्रेस डिझायनर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे.
इंदिसे यांनी यासंदर्भात ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. या वाहिनीवर सायंकाळी ९.३० वाजता सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सुरु आहे. ही मालिका कौटुंबिक स्वरुपाची असून दररोज प्रसारीत होत असते. या मालिकेच्या १४ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसारीत झालेल्या भागामध्ये बौद्ध धर्मियांचे आराध्य दैवत भगवान गौतम बुद्ध यांचा अवमान केल्याचा आरोप आहे.
या मालिकेतील एक पात्र सँडी नावाच्या एका महिला पात्रासाठी कपड्यांची निवड करणार्या (ड्रेस डिझायनर) व्यक्तीने जाणीवपूर्वक सँडी हिस एक निळ्या रंगाचे ब्लाऊजसारखे वस्त्र परिधान करण्यास लावले आहे. या ब्लॉऊजवर पांढर्या रंगामध्ये तथागत गाौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आलेले आहे. गौतम बुद्ध हे जगभरातील बौद्धांसाठी पूजनीय आणि पवित्र आहेत. असे असतानाही ही वाहिनी आणि संबधित मालिकेच्या निर्मात्याने जाणीवपूर्वक अंतवस्त्रामध्ये गणना होणार्या ब्लॉऊजवर तथागत गौतम बुद्धांचे चित्र छापून सर्व बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन ही वाहिनी, मालिकेचे निर्माते, ड्रेस डिझायनर यांच्यावर गुन्हा दाखल करावा; अन्यथा, रिपाइं एकतावादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इंडिसें यांनी या निवेदनातून दिला आहे.