'दिशा पटणीचा डान्स' आणि 'मिलिंद सोमणचे ट्विट'; दिशा सालीयन आत्महत्येशी थेट 'कनेक्शन'?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:11 AM2020-07-03T04:11:49+5:302020-07-03T12:48:05+5:30
दिशा ही एका कंपनीसाठी शरीरसौष्ठव शो आयोजित करणार होती. त्यासाठी तिला २५ लाख रुपये मिळणार होते. मात्र करार करणाऱ्यांनी यात एक अट ठेवली.
- फसलेल्या दोन 'डील्स' ठरल्या जीवघेण्या ?
- कुटुंबीय आणि मित्रांची पोलिसांना माहिती
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: अभिनेते मिलिंद सोमण तसेच अभिनेत्री दिशा पटणी यांच्याशी संबंधित असलेल्या लाखो रुपयांच्या दोन 'डील्स' फ़सल्यामुळे सुशांतसिंग राजपूत (३४) याची माजी बिझनेस मॅनेजर दिशा सालीयन (२९) च्या तणावात होती. त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले असावे असे तिचे कुटुंबीय आणि मित्रांच्या चौकशीत उघड झाल्याचे मालवणी पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे याचा सुशांतच्या आत्महत्येशी काहीही संबंध नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
दिशा ही एका कंपनीसाठी शरीर सौष्ठव शो आयोजित करणार होती. त्यासाठी तिला २५ लाख रुपये मिळणार होते. मात्र करार करणाऱ्यांनी यात एक अट ठेवली. ज्यात या शो मध्ये अभिनेत्री दिशा पटणीचा एक डान्स परफॉर्मन्स असावा असे त्यांचे म्हणणे होते.
मात्र दिशा पटणीने त्याला नकार दिला. त्यामुळे दिशासोबत कंपनीने ती डील रद्द केली. त्यानंतर दिशामार्फतच प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांना सोबत घेऊन व्हीवो या मोबाईल कंपनीसोबत फोटो शूट करण्यात आले. काम पूर्ण झाल्यावर जवळपास १७ लाख रुपयांचे पेमेंटही कंपनीने केले. मात्र त्यानंतर सोमण यांनी सोशल मीडियावर चीनबाबत एक ट्विट केले.
'शरीर और राष्ट्र... दोनों को स्वस्थ रखने का एक ही उपाय है, चीनी बंद.. शरीर के लिए 'देसी गुड' और राष्ट्र के लिए देसी Goods। #SonamWangchuk #BoycottMadeInChina.'
अशा आशयाचे ते ट्विट होते. ही बाब जेव्हा व्हीवो कंपनीला समजली तेव्हा ते सोमण यांच्यावर चिडले आणि त्यांनी दिशाला सोमण यांना जाहिरातीतून काढून अन्य कोणा मॉडेलला नियुक्त करत शूट करण्यास सांगितले. मात्र माझी जबाबदारी फक्त फोटो शूटची होती, त्यानुसार मी ते केलय आणि ती डील आता संपलीय असे तिने कंपनीला स्पष्टपणे सांगितले. मात्र तरी देखील तिला कंपनीकडून यासाठी सतत विचारणा केली जात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही डील्स फसल्याने ती तणावात होती, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र तिच्या घरच्यांनी कोणाही विरोधात तक्रार दाखल करायची नसल्याचे म्हटल्याने आम्ही याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचे तपास अधिकाऱ्याने 'लोकमत' शी बोलताना सांगितले. या सगळ्याचा सुशांतच्या मृत्यूशी संबंध नसल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
आत्महत्येपूर्वी दिशा गरोदर होती?
'दिशाचे एका बड्या अभिनेत्याच्या मुलाशी संबंध होते आणि त्यातून तिला दिवस गेले. मात्र त्याने तिला गर्भपात करायला सांगितले व याच गोष्टीला तिचा विरोध असल्याने त्या तणावात तिने आत्महत्या केली अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र याबाबत मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कालपाड यांना विचारले असता 'दिशाच्या शवविच्छेदन अहवालात अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाही', त्यामुळे ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.