दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समितीने मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस, मागितला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 15:21 IST2022-02-22T15:20:26+5:302022-02-22T15:21:54+5:30
Disha Salian Death Case : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जून २०२० मध्ये सालियन यांच्या मृत्यूच्या आसपासच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समितीने मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस, मागितला अहवाल
मुंबई - बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या कथित आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (MSCW) सोमवारी मुंबईपोलिसांना नोटीस बजावली असून येत्या दोन दिवसात उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जून २०२० मध्ये सालियन यांच्या मृत्यूच्या आसपासच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सालियनवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे," असे एमएससीडब्ल्यूच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
चाकणकर म्हणाल्या की, पेडणेकर यांनी सोमवारी ही तक्रार दाखल केली असून ती मालवणी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली आहे, ज्यांच्या हद्दीत ही घटना घडली होती. चाकणकर पुढे म्हणाल्या, "आम्ही त्यांना तिचा शवविच्छेदन अहवाल, एफआयआरची प्रत आणि प्रकरणाशी संबंधित इतर कागदपत्रांसह दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले."
मालवणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना महिला आयोगाकडून अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांची हत्या झाल्याचा दावा केला होता.
सालियनला मारण्यापूर्वी बलात्कार केल्याचा आरोपही त्यांनी केला. तथापि, मंत्र्यांनी आपल्या दाव्यासोबत कोणताही पुरावा सादर केला नाही. पेडणेकर यांनी राणेंच्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याला कलंकित करत असल्याची टीका केली होती आणि महिला आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
34 वर्षीय सुशांत सिंग राजपूत उपनगरातील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडल्याच्या सहा दिवसांपूर्वी, 28 वर्षीय सालियनने 8 जून 2020 रोजी उपनगरीय मालाडमधील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.
अजबच! मृत कबुतरांसह महिला पोहोचली पोलीस ठाण्यात, पोलिसांनी केले पोस्टमॉर्टम
राजपूत व्यतिरिक्त, सालियनने भारती सिंग, रिया चक्रवर्ती आणि वरुण शर्मा यांसारख्या कलाकारांचे काम देखील सांभाळले होते. गेल्या वर्षी, मुंबई पोलिसांनी सालियनच्या मृत्यूचा तपास बंद केला. कारण या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा पुरावा समोर आला नाही. पोलिसांनी असेही म्हटले होते की, सालियनच्या मृत्यूला राजपूतच्या मृत्यूशी जोडणाऱ्या अनेक आरोपांना समर्थन देणारा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही.