दिशा सालियनचा फोन पोलिसांनीच केला ‘अॅक्टिव्ह’! तपासाचा भाग असल्याचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:13 AM2020-08-26T02:13:36+5:302020-08-26T06:47:13+5:30
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मालवणी पोलीस चौकशी करीत आहेत. मालाडमधील १४ व्या मजल्यावरील घरातून पडून तिचा मृत्यू झाला.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मोबाइल बिलाच्या सविस्तर तपशिलानुसार, त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या फोनवर दिशा सालियनचा फोन आला होता. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिचा मोबाइल कोण वापरत होते, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र मालवणी पोलिसांनी तपासासाठी तो आपणच अॅक्टिव्ह केल्याचे स्पष्ट करत त्यात काहीच संशयास्पद नसल्याचे सांगितले.
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मालवणी पोलीस चौकशी करीत आहेत. मालाडमधील १४ व्या मजल्यावरील घरातून पडून तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सुशांतच्या मोबाइलवर १५ व १७ जून २०२० रोजी तिचा फोन आल्याचे समोर आले आहे. सीबीआयच्या हाती ही माहिती लागल्यानंतर खळबळ उडाली. मात्र तपासाचा भाग म्हणून मालवणी पोलिसांनीच दिशाचा फोन वापरल्याचे समजते. त्या वेळी दिशाचा होणारा पती रोहन रॉय तसेच अन्य वरिष्ठ अधिकारीही तेथे उपस्थित असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी हे दोन फोन करून कोणती माहिती तपासली याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिलेली नाही.
दिशा व सुशांतच्या मृत्यूचा परस्पर संबंध नसल्याचे यापूर्वीच पोलिसांनी स्पष्ट केले. तिच्या वडिलांनी मुलीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली असून पोलीस संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करत आहेत.