शीळ-डायघरमधील हत्येचा २४ तासांत उलगडा; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 01:29 AM2018-11-18T01:29:34+5:302018-11-18T01:29:53+5:30
मोकाशीपाडा येथे डोक्यात दगड घालून केलेल्या हत्येचा शीळ-डायघर पोलिसांनी २४ तासांत उलगडा केला. मारुती पवार असे मृताचे नाव आहे.
ठाणे : मोकाशीपाडा येथे डोक्यात दगड घालून केलेल्या हत्येचा शीळ-डायघर पोलिसांनी २४ तासांत उलगडा केला. मारुती पवार असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सुनील शाहू (२०) आणि रंजय शहा (२०) या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
१५ नोव्हेंबरला शीळ-डायघर पोलिसांना मोकाशीपाडा येथे एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती मिळाली होती. मात्र गुन्ह्यासंबंधी कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी पथक नेमून तपास करून शुक्रवारी सुनीलला त्याच परिसरातून अटक केली, तर रंजय याला मुंबईतील वडाळा येथून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पवार हा नेहमी त्रास देत असल्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. अटक केलेले आरोपी हे मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. या गुन्ह्यामध्ये राज चेपांगन चेपांग (२२) आणि भाई काजी चेपांग यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांचा शोध सुरू आहे, असे सायगावकर यांनी सांगितले.
आरोपींचे कपडे, दगडाची होणार तपासणी
आरोपींनी पवार यांना मारहाण करून फरपटत नेऊन त्यांच्या डोक्यात दोन वेळा १२ ते १५ किलोचा दगड घालून ठार केले. दगड आणि रक्ताचे डाग असलेले आरोपींचे कपडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
असा झाला उलगडा
प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला. तसेच या घटनेनंतर परिसरातील कोणी गायब आहे का, याचा शोध घेतला असता एक हॉटेल अचानक बंद झाल्याचे समजले. तसेच तेथील चार जण गायब झाल्याची माहिती पुढे आली आणि या प्रकरणाचा छडा लागला. याप्रकरणी ६० ते ६५ जणांची चौकशी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी सांगितले.
आरोपी अशिक्षित
अटकेतील सुनील आणि रंजय हे अशिक्षित आहेत. ते तीन महिन्यांपासून शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काम करत होते. तर फरार आरोपीही याच परिसरात असण्याची शक्यता आहे. तसेच हॉटेल मालकाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या पथकाची कामगिरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे,अशोक भंडारे, कृपाली बोरसे,पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे,पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ, संतोष शिंदे,चंद्रकांत गोफणे, पोलीस नाईक राकेश सत्रे, दीपक जाधव,
अजिज तडवी,पंकज गायकर,रतिलाल वसावे, हेमंत भामरे,पोलीस शिपाई प्रदीप कांबळे, आण्णासो एडके यांनी ही कामगिरी केली.