औरंगाबादेत आजी-माजी पोलीस अधिकारी भिडले; कारला धक्का लागल्याचे ठरले कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:37 PM2018-07-17T19:37:17+5:302018-07-17T19:39:11+5:30

कारला धक्का लागल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक भास्कर राणोजी गणकवार यांच्यात हमरीतुमरी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले.

Dispute happens between two police officers at Aurangabad | औरंगाबादेत आजी-माजी पोलीस अधिकारी भिडले; कारला धक्का लागल्याचे ठरले कारण

औरंगाबादेत आजी-माजी पोलीस अधिकारी भिडले; कारला धक्का लागल्याचे ठरले कारण

googlenewsNext

औरंगाबाद : कारला धक्का लागल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक भास्कर राणोजी गणकवार यांच्यात हमरीतुमरी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता महावीर चौक उड्डाणपुलाखाली पंचवटी चौकात घडली. शेवटी दोन्हीही अधिकारी स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहिल्याने छावणी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून परस्परांविरोधात गुन्हे नोंदविले.

छावणी पोलिसांनी सांगितले की, जारवाल हे रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांसह कारने (एमएच-४० एसी ७९२३) कोकणवाडीमार्गे छावणीकडे जात होते. त्याच वेळी गणकवार (रा. हायकोर्ट कॉलनी) हे त्यांच्या कारने (एमएच-१९ एपी ००५६) रेल्वेस्टेशनकडून महावीर चौकाकडे जात होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कारमध्ये अपघात झाला. 

अपघातानंतर दोन्ही कारमधून आजी-माजी अधिकारी उतरले आणि ते परस्परांना दोष देऊ लागले. यावेळी प्रकरण हमरीतुमरीपर्यंत गेले. ते परस्परांना ओळखत नसल्याने जारवाल यांनी थेट छावणी ठाण्यात धाव घेतली. त्यांनी गणकवार यांच्याविरुद्ध कारच्या डिक्कीचे नुकसान केल्याची आणि उद्धटपणे बोलल्याची तक्रार दाखल केली. त्याच वेळी गणकवार हे छावणी ठाण्यात दाखल झाले. त्यांनी त्यांचीही जारवालविरोधात तक्रार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांनीही जारवाल यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे कार चालवून आपल्या कारला धडक दिल्याची व  शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदविली. उभयतांच्या तक्रारींवरून छावणी पोलिसांनी परस्परांविरोधी गुन्ह्याची नोंद केली. 

तडजोडीचा प्रयत्न फसला
तक्रारदार आजी- माजी पोलीस अधिकारी असल्याने याप्रकरणी गुन्हे न नोंदविता आपसात मिटवून घ्यावे, यासाठी काही जणांनी प्रयत्न केले. मात्र उभय अधिकारी तडजोड करण्याच्या मन:स्थितीत नसल्याने शेवटी छावणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

Web Title: Dispute happens between two police officers at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.