१५ रुपयांऐवजी २० रुपयांना २ समोसे दिल्यानं वाद पेटला; स्वत:ला पेटवून घेत ग्राहकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:46 PM2021-07-27T20:46:56+5:302021-07-27T20:48:38+5:30
स्वत:वर पेट्रोल टाकून ग्राहकाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू
शहडोल: मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एकानं आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे समोसाच्या दरावरून झालेल्या वादावरून हा प्रकार घडला. समोसाच्या दरावरून ग्राहक आणि दुकानदाराचा वाद झाला. त्यानंतर तरुणानं पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अनुपपूर जिल्ह्यात अमरकंटकमध्ये समोस्याच्या वाढत्या दरावरून दुकानदार आणि ग्राहकाचा वाद झाला. त्यानंतर ग्राहकानं स्वत:वर पेट्रोल टाकलं आणि आग लागली. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं जात होतं. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुकानदारानं महागाईचं कारण देत २ समोस्यांसाठी १५ ऐवजी २० रुपये मागितल्यानं वाद पेटला. ग्राहकानं भांडणादरम्यान पत्नीवर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा दावा दुकानदारानं केला. ग्राहकानं स्वत:ला पेटवून घेण्याआधी पत्नीची साडी खेचल्याचा आरोपही त्यानं केला. याबद्दल त्यानं पोलीस तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कलम २९४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले. दुकानदारानं पोलिसात तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (२३ जुलै) जैस्वाल पुन्हा दुकानात गेला. समोस्याचा वाढलेला दर आणि पोलीस ठाण्यात केलेली तक्रार यावरून जैस्वालनं पुन्हा दुकानदाराशी वाद घेतला. त्यानं दुकानदाराला जिवे मारण्याची धमकी दिली. थोड्या वेळानं त्यानं स्वत:ला पेटवून घेतलं.
दुकानाजवळ उपस्थित असलेल्यांनी जैस्वालला वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यानं अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्याच्या कुटुंबियांनी मोबाईलवर त्याचा शेवटचा जबाब रेकॉर्ड केला. दुकानदार आणि पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं जैस्वालनं म्हटलं.