शिक्षण संस्थाचालकास २५ लाखांची खंडणी मागणारा समाजवादी पार्टीचा जिल्हाध्यक्ष जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:02 PM2019-12-05T12:02:40+5:302019-12-05T12:02:40+5:30
दबा धरून बसलेल्या पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले रंगेहात
औरंगाबाद : शिक्षण संस्थाचालकाकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागणाºया समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षासह साथीदाराला पुंडलिकनगर पोलिसांनी रंगेहात अटक केली. ही घटना बुधवारी विद्यानगर येथील जागृत हनुमान मंदिराजवळ घडली.
अमितकुमार अनिलकुमार सिंग (२८, रा. कुंज, ता. ओहारी, पोलीस ठाणे नवादा, जि. नवादा, बिहार, ह.मु. नवकारयश सोसायटी, पोलीस कॉलनी, पडेगाव) व त्याचा साथीदार प्रशांत राम वाघरे (२९, रा. लिंबगाव, ता. नांदेड, ह.मु. नामदेव पवार यांच्या बिल्डिंगमध्ये गोदावरी लॉनजवळ), अशी अटक केलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. सुनील पालवे (रा. अंबिकानगर, गारखेडा) यांच्या ११ शैक्षणिक संस्था आहेत. दोन महिन्यांपासून सिंग हा शैक्षणिक संस्थेची माहिती उघड न करण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागत होता. पालवे यांनी अखेर सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खात्रीलायक माहिती जमा केली.
५ लाखांवर तडजोड झाली
अमितकुमार सिंगसोबत चर्चा होऊन पाच लाखांत तडजोड झाली आणि अखेर पैसे देण्याचे ठरले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याने सापळा रचला. आरोपीच्या हातात पाच लाख रुपये नोटांचे बंडल असलेले पाकीट देण्यात आले. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे इशारा केला अन् आरोपी दोघांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेण्यात आले. अमितकुमार सिंगविरुद्ध बेगमपुरा, जिन्सी येथेदेखील गुन्हे दाखल असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुंडलिकनगर ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे, पोहेकॉ. रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, दीपक जाधव, नितेश जाधव, पोलीस शिपाई अत्तार, शिवा बुट्टे, संतोष बोधक, स्वप्नील विटेकर यांच्या पथकाने पार पाडली.
कागदी नोटांचे बंडल
एवढे पैसे आणायचे कुठून म्हणून ५०० रुपये नोटांच्या आकाराच्या कागदाचे १० बंडल तयार करून पाच लाख रुपयांची बतावणी करण्यात आली. आरोपीने बंद पाकिटामधील पाच लाख स्वीकारले. संबंधिताने डोळ्यावरील चष्मा काढला आणि आरोपी जाळ्यात अडकले.
चारचाकी दोन वाहने जप्त
अमितकुमार अनिलकुमार सिंग व त्याचा साथीदार दोन स्वतंत्र महागड्या चारचाकीतून विद्यानगरात आले होते. दोघांनी मिळून पालवे यांच्याकडून बंडल स्वीकारताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.