हुंड्यासाठी विवाहितेस छळ करून 'तलाक'; मराठवाड्यात पहिला गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:23 PM2019-08-14T13:23:07+5:302019-08-14T13:29:07+5:30

‘तीन तलाक’चा पहिला गुन्हा औरंगाबादच्या जिन्सी ठाण्यात 

'Divorce' women tortured for dowry; First offense of 'Tin Talaq' registered in Marathwada | हुंड्यासाठी विवाहितेस छळ करून 'तलाक'; मराठवाड्यात पहिला गुन्हा दाखल 

हुंड्यासाठी विवाहितेस छळ करून 'तलाक'; मराठवाड्यात पहिला गुन्हा दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देसासरकडून महिलेचा छळ२ लाखाच्या हुंड्याची मागणी

औरंगाबाद : केंद्र शासनाने तीन तलाक प्रथेविरोधी अलीकडेच नवीन कायदा मंजूर केला. त्यानंतर शहरात प्रथमच या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिन्सी ठाण्यात हा गुन्हा पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर दाखल करण्यात आला. माहेरी आलेल्या विवाहितेला तीन वेळा तलाक म्हणून पती निघून गेल्याची तक्रार प्राप्त होती. 

पोलीस निरीक्षक व्यंक टेश केंद्रे यांनी सांगितले की, नारेगाव भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा २०१८ मध्ये शेख सलमान शेख लाल याच्यासोबत मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. काही दिवस चांगले वागविल्यानंतर माहेरहून २ लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तिचा छळ केला जाऊ लागला. त्यामुळे तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी सासरा शेख लाल शेख युसूफ याने जिन्सी पोलीस ठाण्यात सून हरवल्याची खोटी तक्रार दिली. मात्र, पोलीस चौकशीत ही बाब खोटी निघाल्याने सासरची मंडळी अडचणीत आली. त्यांनी जिन्सी पोलिसांसमोर चूक झाल्याचे कबूल करीत माफी मागितली आणि सुनेला नांदविण्याची ग्वाही दिली. 

सासरी जाताच सासऱ्याकडून तिची छेडछाड होऊ लागली. याबाबत कोणाला सांगू नको म्हणून सासरा आणि पतीने मारहाण करीत तिला माहेरी आणून सोडले. काही दिवसांनंतर त्यांनी विवाहितेला पुन्हा सासरी नेले. पती कामासाठी हरियाणा येथे गेल्यानंतर सासऱ्याकडून पुन्हा छळ सुरू झाला. ही बाब तिने पतीला सांगितल्यानंतर तो तातडीने गावी आला. मात्र, आई-वडिलांचे ऐकून त्याने पत्नीला मारहाण केली. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाची तक्रार दाखल केली. त्यामुळे पतीकडून फोनवरून सोडून देण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. रमजान ईदच्या काळात घरी येऊन पतीने तिला लाकडी दांड्याने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल आहे. 

पती सलमान शुक्रवारी (दि.९) पुन्हा सासुरवाडीत गेला व हुंड्यात राहिलेले २ लाख रुपये दिले तरच मुलीला नांदविण्यास नेईल, अन्यथा मुलीला तलाक देतो, असे धमकावले. काही वेळानंतर त्याने तीन वेळा तलाक उच्चारले व तो तेथून निघून गेला. शहरात प्रथमच हा गुन्हा दाखल करावा लागत असल्याने पोलिसांना कायद्याचा अगोदर गांर्भीयाने अभ्यास करावा लागला. त्यानंतर कोणते कलम लावावेत याचा निर्णय घेतला.

मराठवाड्यात पहिला गुन्हा
या प्रकरणी विवाहितेने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी करून मंगळवारी (दि.१३) मुस्लिम महिला विवाह वरील हक्कांचे संरक्षण कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार सुभाष हिवराळे करीत आहेत. हा कायदा अस्तित्वात आल्यापासून मराठवाड्यातील हा पहिलाच गुन्हा असावा. 

Web Title: 'Divorce' women tortured for dowry; First offense of 'Tin Talaq' registered in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.