२ कोटींची लाचखोर अधिकारी..आलिशान रिसोर्टमध्ये पाहुण्यांना मिळायची 'खास' सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:30 PM2023-01-19T12:30:57+5:302023-01-19T12:31:09+5:30
राजस्थानच्या लाचलुचपत विभागाच्या जयपूर टीमने २ कोटीची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई केली होती. ज्यात दिव्या मित्तलला अटक करण्यात आली.
उदयपूर - राजस्थानात तब्बल २ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या एएसपी दिव्या मित्तलच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अटकेनंतर पोलिसांनी उदयपूरजवळील चिकलवास येथील फार्म हाऊस आणि रिसोर्ट नेचर हिलहून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. जी त्याठिकाणी आलेल्या विशेष पाहुण्यांना दिली जाते.
रिपोर्टनुसार, या रिसोर्टचं व्यवस्थापन उदयपूर पोलीस दलातून निलंबित कर्मचारी सुमित कुमार करायचा. जो लाचखोरीत पकडला होता. अंबामाता पोलिसांनी सुमित आणि दिव्या मित्तल यांच्याविरोधात लाच प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दिव्या मित्तलच्या रिसोर्टवर २७ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याठिकाणी दारू विक्रीचं कुठलेही लायसन्स नसल्याचं तपासात आढळलं त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
ही दारू बेकायदेशीरपणे रिसोर्टवर ठेऊन पर्यटकांना दिली जायची. याच रिसोर्टला स्पेशल ऑपरेशन ग्रुपची एएसपी दिव्या मित्तलने ड्रग्स प्रकरणात सुमित कुमारच्या माध्यमातून आरोपीला बोलावून त्याला धमकावत २ कोटींची लाच मागितली. याआधी सुमितनं दिव्या मित्तलसाठी २५ लाखांची पहिली लाच मागितली. जी आरोपी दिव्या मित्तलला देणार होता.
राजस्थानच्या लाचलुचपत विभागाच्या जयपूर टीमने २ कोटीची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई केली होती. ज्यात दिव्या मित्तलला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दिव्या मित्तलच्या अजमेर येथील खासगी निवासस्थानी धाड टाकली. मात्र कुठलीही लाच मागितली नसल्याचा दावा दिव्या मित्तलनं केला. ड्रग्स माफियांना पकडल्यामुळे बक्षीस म्हणून मला ही रक्कम मिळाली आहे. अजमेर पोलीस अधिकारीही ड्रग्स प्रकरणी जाळ्यात अडकल्याचं दिव्या मित्तलनं सांगितले. अजमेरमध्ये कार्यरत दिव्या मित्तल मूळच्या हरियाणातील आहेत. परंतु ४५ वर्षापूर्वी त्यांचे कुटुंब याठिकाणी वास्तव्यास आले होते. चिडवा येथे त्यांच्या वडिलांनी ट्रॅक्टर एजन्सी उघडली होती. त्यानंतर २ भावांनी प्रायव्हेट बस, माइनिंग हे उद्योग सुरू केले.