हॉटेल मालकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती दिव्या, 100 तासांनंतरही सापडला नाही मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 09:51 AM2024-01-05T09:51:12+5:302024-01-05T09:52:31+5:30
Divya Pahuja Murder Case : दिव्या पाहुजा आणि अभिजीत सिंह हे 3 महिन्यांपासून संपर्कात होते आणि लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहू लागले.
मॉडेल दिव्या पाहुजा 25 जुलै 2023 रोजी जेलमधून जामिनावर सुटली. जेलमध्ये बंद असलेल्या गँगस्टर बिंदर गुर्जरच्या सांगण्यावरून ती हॉटेल मालक अभिजीत सिंहला भेटली. यानंतर ती लिव्ह इनमध्ये राहू लागली. गुरुग्रामचे डीसीपी क्राइम विजय प्रताप सिंह यांनी सांगितलं की, हत्येतील आरोपी अभिजीत सिंहने चौकशीदरम्यान अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.
दिव्या पाहुजा आणि अभिजीत सिंह हे 3 महिन्यांपासून संपर्कात होते आणि लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहू लागले. यावेळी दिव्याने अभिजीतचे अश्लील व्हिडीओ तिच्या मोबाईलमध्ये कैद केले होते. दिव्या त्याबद्दल अभिजीतला ब्लॅकमेल करत होती. यामुळेच अभिजीतने दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या केली. डीसीपीचे म्हणणे आहे की, ज्या बीएमडब्ल्यू कारमधून हत्येनंतर दिव्याचा मृतदेह नेण्यात आला होता ती पंजाबमधील पटियाला बसस्थानकावरून जप्त करण्यात आली आहे. त्या कारची डिकी उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
27 वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची मंगळवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली होती. दिव्या ही यापूर्वी गँगस्टर संदीप गाडोलीची गर्लफ्रेंड होती. दिव्याच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी हॉटेल मालक अभिजीत सिंह आणि हॉटेल कर्मचारी ओम प्रकाश आणि हेमराज यांना अटक केली. ओमप्रकाश आणि हेमराज यांनी दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती.
हॉटेल मालक अभिजीत सिंहने दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या साथीदारांना 10 लाख रुपये दिले होते. दिव्याचा मृतदेह अभिजीतच्या बीएमडब्ल्यू कारच्या डिकीमध्ये टाकून अभिजीतचे दोन साथीदार पळून गेले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अभिजीतला ब्लॅकमेल करत होती दिव्या
हत्येतील मुख्य आरोपी अभिजीत सिंह याने हॉटेल सिटी पॉइंटचा मालक असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. या हॉटेलमध्ये दिव्याची हत्या करण्यात आली. अभिजीतने गुरुग्राम पोलिसांना सांगितले की, त्याचे काही अश्लील फोटो दिव्या पाहुजासोबत होते. याच्या माध्यमातून ती ब्लॅकमेल करत होती.
दिव्याने अनेकदा यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले होते. यावेळी ती मोठी रक्कम मागत होती. 2 जानेवारी रोजी तो दिव्याला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि फोटो डिलीट करण्यास सांगितले. तिच्या मोबाईलचा पासवर्ड विचारला असता तिने सांगितले नाही. याचा राग आल्याने अभिजितने रागाच्या भरात दिव्यावर गोळी झाडली.