दिवाळी फराळ पडला महागात; बंद घरावर चोरट्यांचा डल्ला
By राजकुमार जोंधळे | Published: November 13, 2023 11:56 PM2023-11-13T23:56:49+5:302023-11-13T23:57:33+5:30
१९ तोळे सोन्यासह दोन लाखांची रोकड लंपास...
राजकुमार जाेंधळे
औसा (जि. लातूर) : दिवाळी सणानिमित्त घर कुलूपबंद करून मित्रांकडे फराळासाठी जाणे एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यावर पाळत ठेवत चोरट्यांनी बंदघरावर डल्ला मारला. कपाटात ठेवलेले १९ तोळे साेन्याचे दागिने आणि दाेन लाखांची राेकड असा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. ही घटना ऐन दिवाळी सणामध्ये साेमवारी दुपारी दिवसाढवळ्या घडली आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा शहरात सारोळा रोडनजीक चक्रधर शाळेसमोरील भागात राहत राहणाऱ्या गणी साहेबलाल शेख (वय ४३) हे आपल्या कुटुंबीयासह साेमवारी दुपारी १ ते २:३० वाजेच्या दरम्यान घर बंद करून मित्राच्या घरी दिवाळीचा फराळ करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांच्यावर चाेरट्यांनी पाळत ठेवत घराच्या गेटवरून प्रवेश केला. मुख्य दरवाजाचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन बेडरूममधील कपाटात ठेवलेले नेकलेस, राणीहार, बोरमाळ, अंगठीसह इतर असे एकूण १९ तोळे साेन्याचे दागिने (किंमत ९ लाख) आणि दाेन लाखांची राेकड लंपास केली. हा प्रकार फिर्यादी घरी आल्यानंतर लक्षात आला. घटनास्थळी तुटलेले कुलूप, कडी-कोयंडा, कपाट, दागिन्यांचे रिकामे बॉक्स, कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले.
घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत लोंढे, अंमलदार शिवरूद्र वाडकर, मुबा शेख यांच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला. शिवाय, घटनास्थळावर श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले हाेते. श्वानाने सारोळा रोडपर्यंत चाेरट्यांचा माग काढला, मात्र ताे तिथेच घुटमळला. याबाबत औसा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.