श्रद्धा वालकरची हाडे, केस यांचे डीएनए नमुने जुळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:54 AM2023-01-05T08:54:16+5:302023-01-05T08:54:35+5:30
गेल्या १८ मे रोजी आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केली होती. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहात होते.
नवी दिल्ली : दिल्ली येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील माइटोकॉन्ड्रियल डीएनए चाचणी अहवाल दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. श्रद्धा हिची हाडे व केसांचे नमुने जुळले आहेत. हैदराबाद येथील सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स या संस्थेने ही तपासणी केली आहे.
दिल्लीतील विशेष पोलिस आयुक्त सागरप्रीत हुड्डा (कायदा व सुव्यवस्था) यांनी सांगितले की, श्रद्धाची हाडे व केसांबाबतचा अहवाल मिळाला असला तरी अद्याप आणखी काही प्रक्रिया बाकी आहेत. गेल्या महिन्यातही एक डीएनए चाचणी करण्यात आली होती. दिल्लीतील जंगलात मिळालेल्या हाडांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यावेळी श्रद्धा व तिच्या वडिलांचे डीएनए जुळले होते.
गेल्या १८ मे रोजी आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केली होती. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहात होते. तिची हत्या केल्यावर आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी त्याने ३०० लिटरचा नवीन फ्रीज खरेदी केला होता. त्यानंतर तो १८ दिवस रोज रात्री जवळच्या जंगलात जाऊन श्रद्धाचे अवशेष तिथे फेकून परत येत असे.