२४६७ कोटींच्या 'ज्ञानराधा' घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुरेश कुटे आता ईडीच्या कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 08:21 IST2025-01-10T08:21:07+5:302025-01-10T08:21:49+5:30
ज्ञानराधा सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या

२४६७ कोटींच्या 'ज्ञानराधा' घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुरेश कुटे आता ईडीच्या कोठडीत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सुरेश कुटे याचा ताबा आता ईडीने घेतला आहे. त्याने २२ कंपन्या आणि ४ एलएलपी कंपन्या स्थापन करत या सोसायटीतील पैसे स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये वळवत त्याचा वापर केल्याचा आरोप ईडीने त्याच्यावर ठेवला आहे.
ज्ञानराधा सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या. तसेच, सोसायटीने सोने, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज अशा कर्ज योजनाही सादर केल्या होत्या. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांच्या नियंत्रणाखाली सोसायटीचे काम होत होते. त्यांनी राज्यभरातील किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
काही ठराविक गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी परतावा दिला होता. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांना एक रुपयाही परत मिळालेला नाही. कुटे यांनी २४६७ कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्जरुपाने वळवल्याचा ठपकाही ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे वैयक्तिक मालमत्तांची खरेदी त्यांनी केली.