त्या चिमुकलीची डीएनए तपासणी करा : उपसभापती निलम गोऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 08:55 PM2019-12-09T20:55:09+5:302019-12-09T21:07:40+5:30
कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे रविवारी एका पाच वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या बालिकेची त्वरीत डीएनए तपासणी करण्याच्या सूचना आपण पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सोमवारी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे रविवारी एका पाच वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. नेमकी त्या बालिकेची हत्या करण्याचे कारण काय? तिच्यावर आरोपीकडून अत्याचाराचा प्रयत्न तर झाला नाही ना? हे सर्व निष्पन्न होण्यासाठी त्या बालिकेची त्वरीत डीएनए तपासणी करण्याच्या सूचना आपण पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सोमवारी सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस आल्या आहे. महिला सुरक्षा व पायाभूत ससुविधांची निगराणी याबाबत रस्ते वाहतुक, हायवे अॅथॉरिटी, टोल प्लाझा देखरेख करतांना फक्त सीसीटीव्ही पुरेसे नसुन कॅमेरे ऑन लाईन व्हिजीलन्स माध्यमातून देखरेख करण्यात यावी. विशेषत: तेलंगणातील हायवेवरील घटना पाहिली तर महिला विरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी या तंत्रज्ञान आणि यंत्रणेचा उपयोग सर्व टोल प्लाझा व द्र्रुतगती मार्गावर करून घेण्यात यावा. अशी देखील सूचना आपण पत्राच्या माध्यमातून मुख्यममंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्भया फंड वापरण्यासाठी कृती आराखडा तयार व्हावा
निर्भया फंडाचे पैसे खर्च होत नसल्याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. हा निधी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच निर्भया फंड वापरण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली असल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
नागपूर पोलिसांच्या उपक्रमाची प्रशंसा
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. शहरातील कुठल्याही एरियात रात्री ९ नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल, तर त्या महिलेने पोलीस नियंत्रण कक्षातील भ्रमणध्वनी क्रमांक डायल केल्यास पोलीस तिच्या मदतीला धावून येतील आणि तिला सुखरुप घरी पोहचवतील, असा उपक्रम सुरू केला आहे. नागपूर पोलिसांनी सूरू केलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले.