मी काय स्पायडर मॅन आहे काय त्यांना पकडायला?; उर्मटपणा पोलीस अधिकाऱ्याला भोवला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 03:54 PM2018-12-08T15:54:15+5:302018-12-08T15:56:44+5:30
आता तर चक्क मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी न्यायाधीशांना मी काय स्पायडरमन आहे काय त्यांना पकडायला असं उत्तर दिल्याने अंगाशी आलं आहे. त्यामुळे त्यांची तडकाफडकी पोलीस आयुक्तांनी साईड ब्रँच असलेल्या एसीबी (विशेष शाखा ) - २ येथे बदली केली आहे.
मुंबई - पोलिसांकडून प्रत्येक नागरिकाला योग्य उत्तर किंवा प्रतिसाद मिळेलच असं नाही. बहुतांश वेळा पोलिसांकडून नागरिकांना तावातावाची वर्तणूक अनुभवायला मिळते. त्यामुळे पोलिसांच्या खाकीची नकारात्मक प्रतिक्रिया बऱ्याच नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता तर चक्क मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी न्यायाधीशांना मी काय स्पायडरमन आहे काय त्यांना पकडायला असं उत्तर दिल्याने अंगाशी आलं आहे. त्यामुळे त्यांची तडकाफडकी पोलीस आयुक्तांनी साईड ब्रँच असलेल्या एसीबी (विशेष शाखा ) - २ येथे बदली केली आहे.
गेल्या आठवड्यात मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मरीन ड्राईव्ह परिसरात नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीला स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे उपस्थित होते. सकाळी नाकाबंदी सुरु असताना दुसऱ्या बाजूला मॉर्निग वॉक करणाऱ्यांची गर्दी होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे नाकाबंदीवर लक्ष ठेवून असताना एक दुचाकी त्यांच्यासमोरुन गेली. त्या दुचाकीवर तिघेजण असतानाही विलास गंगावणे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. हा प्रकार मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका न्यायाधीशांनी पाहिला. याबाबत त्या न्यायाधीशांनी विलास गंगावणे यांना आपण त्या ट्रिपल सीट बाईकस्वाराला पकडा असे सांगितले. यावर विलास गंगावणे यांनी त्यांनी उर्मट शब्दात उत्तर दिले की, ‘मी काय स्पायडरमॅन आहे काय त्यांना पकडायला’ आणि तिथेच त्यांची फसगत झाली. न्यायाधीश प्रतिउत्तर न करता निघून गेले. मात्र, रोज कायदा मोडणाऱ्यांना जाब विचारणारे न्यायाधीश यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस आयुक्तांना फोन करून घडलेला प्रकार कानावर घातला आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर मुंबई पोलीस आयुक्तानी विलास गंगावणे यांची एसबी - 2 येथे तडकाफडकी बदली केली.