घरमालकांनो सावधान! ओळखपत्रांशिवाय खोल्या भाड्याने देऊ नका, खोट्या गुन्ह्यात अडकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 11:41 PM2019-02-06T23:41:52+5:302019-02-06T23:42:08+5:30
वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देणे सक्तीचे व बंधनकारक केले आहे.
चाकण - वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात देणे सक्तीचे व बंधनकारक केले आहे. मात्र, अशी माहिती देताना आपण खोट्या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता असल्याने खोल्या भाड्याने देताना सावधानता बाळगण्याची वेळ चाकण पंचक्रोशीतील घरमालकांवर आली आहे.
नवरा-बायको नसतानाही ओळखीची कागदपत्रे मागितल्याने काल खराबवाडी (ता. खेड) येथे एका तरुणीने आपण अविवाहित असल्याचे बिंग फुटल्याने एका घरमालकाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच संबंधित तरुणीने प्रतिज्ञापत्र सादर करून खोटी फिर्याद दिल्याचे कबुल केले आहे.
या घटनेमुळे घरमालकाला नाहक बदनामीला सामोरे जाऊन मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे घरमालकांनी ओळखपत्राशिवाय खोल्या भाड्याने देऊ नये, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यापूर्वी चाकण परिसरात दहशतवादी असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच औद्योगिकरणामुळे वाढती लोकसंख्या ही सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. चाकण परिसरात स्थानिक भूमिपुत्रांचा खोल्या बांधून भाड्याने देणे हा व्यवसाय बनला आहे.
वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलिसांनी भाडेकरूंची माहिती सादर करणे घरमालकांना बंधनकारक केले आहे. तसेच भाडेकरूंची माहिती सादर न केल्यास घरमालकांवर गुन्हे दाखल केले जातात, त्यामुळे घरमालकांची चिंता वाढली आहे.
खराबवाडी (ता. खेड) येथील कड आळीत असणाऱ्या एका खोलीत अहमदनगर जिल्ह्यातील २० वर्षीय तरुणी २५ जानेवारीपासून आपल्या मित्रासोबत आपण पती-पत्नी असल्याचे सांगून भाड्याने राहत होती. वारंवार ओळखपत्र मागूनही ते द्यायचे टाळत होते.
परंतु दोघांकडेही ओळखपत्र नव्हते.
बिंग फुटल्याने तरुणीने घेतला बदला
सुपरवायझर कृष्णा रामराव चांदणे हे संबंधित तरुणीच्या खोलीजवळ जाऊन तुमचे व तुमच्या नवºयाचे फोटो, आधारकार्ड व पॅनकार्ड त्वरित द्या, सदर माहिती चाकण पोलिसांना विहीत नमुन्यात भरून द्यायची आहे, असे सांगितले. त्या वेळी संबंधित तरुणीने हा माझा नवरा नसून माझा मित्र (बॉयफ्रेंड) असल्याचे सांगितले असता चांदणे यांनी ही बाब घरमालक कड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे घरमालक कड हे चांदणे सोबत तिथे जाऊन त्या तरुणीला खोली रिकामी करायला सांगितले.
आपण नवरा-बायको नसल्याचे बिंग फुटल्याने सदर तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात घरमालकाविरुद्ध विनयभंगाची खोटी फिर्याद दिली. मात्र, महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी पोलिसी खाक्या दाखवताच ती तरुणी पोपटासारखे बोलू लागली व आपण खोटी फिर्याद दिल्याचे कबूल केले. त्यानंतर त्या तरुणीकडून रितसर प्रतिज्ञापत्र करून ‘त्या’ घरमालकाची अखेर सुटका झाली.