पैसे घेवू नका आणि कोणालाही देवूही नका - सुबोध जायस्वाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:30 PM2019-01-30T23:30:59+5:302019-01-30T23:35:02+5:30
पोलीस आयुक्तांनी घेतला ३०० उपनिरीक्षकांचा तास
जमीर काझी
मुंबई - पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी ‘अर्थ’पूर्ण चर्चा करण्यात माहीर असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामे पूर्ण करुन घेण्यासाठी अस्थापनेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा खिसा गरम करावा लागतो, याची अप्रत्यक्ष कबुली मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी आज नव्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिली.
तुम्ही नागरिकांकडून पैसे घेवू नका आणि तुमच्या कामासाठी पोलीस क्लार्कना एक पैसाही देवू नका, असा दम देत कसलीही अडचण, तक्रार असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा, अशी सूचना केली. मुंबई पोलीस दलात नव्याने कार्यरत झालेल्या ३११ परिवेक्षणार्थी उपनिरीक्षकांशी आयुक्त जायस्वाल यांनी सुमारे दोन तास संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. आझाद मैदान पोलीस क्लबवरील प्रेरणा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात स्लाईड शोद्वारे सादरीकरण करीत पोलिसांसमोरील आव्हाने आणि कामाबाबतचे सविस्तर विवेचन केले.
राज्य लोकसेवा आयोगामार्गत खात्यातर्गंत उपनिरीक्षक दलाची परीक्षा उर्त्तीण झालेले सत्र ११५ व ११६ बॅचमधील ३११ अधिकारी तीन टप्यात अनुक्रमे १० ऑक्टोबर व २२ नोव्हेंबर २०१८ आणि गेल्या ९ जानेवारीला मुंबई पोलीस दलात रुजू झालेले आहेत. त्या सर्वांशी मुक्त संवाद साधताना आयुक्तांनी स्वत: मुंबईत १९८६ पर्यवेक्षणार्थी उपायुक्त असताना केलेल्या कामाची अनेक उदाहरणे दिली. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करु नका, तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिक, तक्रारांशी सौजन्याने वागा, महिला व बालकांना मदतीसाठी नेहमी प्राधान्य द्यावे, त्यामध्ये कोणतीही कुचराई केल्याचे आढळून आल्यास आपण सहन करणार नाही. कार्यालयीन कामे करण्यासाठी पोलीस क्लार्कना पैसे देण्याची वाईट प्रथा पडली आहे. त्याला अजिबात बळी पडू नका, त्या कामामध्ये काही अडचण, व्यत्यय येत असल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा, असे सांगून ते म्हणाले,‘ सध्या माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये अवगत व्हावे लागेल, सायबर क्राईमचे प्रकार, त्यातील तांत्रिक ज्ञान शिकून घेतले पाहिजे. मुंबई पोलीस दलाचा स्वत:चा एक लौकिक आहे, तो पुढे कायम ठेवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे अधिकारपदाचा वापर जबाबदारीने करा. वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबरच अंमलदारांशी सन्मानाने वागा. यावेळी सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवन भारती, सहआयुक्त (प्रशासन), संतोष रस्तोगी यांनीही नुतन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सोशल मिडीया दुधारी अस्त्र
सोशल मिडीयामुळे कोणतीही बाब आता लपून रहात नाही. त्यामुळे खात्यातील अनेक प्रकरणे उघडकीस आल्याची उदाहरणे देवून आयुक्त जायस्वाल म्हणाले,‘ असे सांगता आयुक्तांनी सोशल मिडीया हे दुधारी अस्त्र आहे. त्याचा जितका फायदा आहे, तितकेच धोकादायक पण आहे. याचे भान ठेवून त्याचा वापर करा. स्वत:ची व पोलीस दलाची बदनामी होईल, असे कोणतेही कृत्य करु नका.