मूळव्याधावर निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करणाऱ्या डाॅक्टरला अटक; माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 01:23 PM2021-06-25T13:23:30+5:302021-06-25T13:25:01+5:30
टॅक्सीचालकाच्या तक्रारीनंतर माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई : एमबीबीएस डाॅक्टरला मूळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याची कायदेशीर परवानगी नसतानाही एक डाॅक्टर ६ ते ७ वर्षांपासून मूळव्याधावर शस्त्रक्रिया करत हाेता. गोरेगावातील टॅक्सीचालकाला त्याच्या चुकीच्या उपचारांमुळे नाहक त्रास झाला. त्याच्या तक्रारीवरून गोपाळराव क्लिनिकच्या डॉक्टर एस. मुकेश कोटाला माटुंगा पोलिसांनी अटक केली.
गोरेगाव परिसरात राहणारे ४३ वर्षीय तक्रारदार टॅक्सीचालकाला गेल्या ३ वर्षांपासून मूळव्याधीचा त्रास होता. त्यांच्या सहकारी चालकांनी दादर टी. टी. सर्कल येथेे असलेल्या गोपाळराव क्लिनिकबाबत त्यांना सांगितले. त्यांनी फेब्रुवारीत तेथील डॉ. एस. मुकेश कोटा यांची भेट घेत उपचार सुरू केले.
२१ फेब्रुवारीला कोटाने २५ हजार घेऊन शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर चार तासांनी त्यांना घरी पाठवेले. ते पत्नीसह टॅक्सीने घरी जात असतानाच त्यांना रक्तस्राव होऊ लागला. चक्कर येऊन कोसळल्याने केईएम रुग्णालयात त्यांना करण्यात आले. तेथे डाॅ. कोटाने चुकीच्या पद्धतीने निष्काळजीपणाने उपचार केल्याचे समाेर आले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर २५ मार्च रोजी त्यांनी माटुंगा पोलिसांत तक्रार दिली. शस्त्रक्रियेमुळे त्यांच्यावर डायपर घालण्याची वेळ ओढावली. वाहन चालविणे शक्य नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला.
माटुंगा पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, जे. जे. रुग्णालयाकडे याबाबत विचारणा केली. यासाठी जे.जे. रुग्णालयात २१ जून राेजी तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात एमबीबीएस डॉक्टर मूळव्याधावर शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. त्यासाठी एम.एस. सर्जरी ही अतिरिक्त शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. तसेच उपचार करताना कोटाने निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केल्याचे यत नमूद आहे. त्यानुसार कोटाला अटक करण्यात आली. दरम्यान, कोटा गेल्या ६ ते ७ वर्षांपासून मूळव्याधावर शस्त्रक्रिया करत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या अन्य रुग्णांचे काय झाले, याबाबतही पोलीस तपास करत आहेत.