होम लोन देतो सांगून डॉक्टरासह बहिणीला लाखोंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 09:56 PM2019-06-06T21:56:58+5:302019-06-06T21:57:53+5:30
फसवणूक झालेल्या डॉक्टरांनी तुळींज पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
नालासोपारा - एव्हरशाईन विभागातील एका इमारतीमध्ये असलेल्या दाताच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर आणि त्यांच्या बहिणीला खाजगी गृहकर्ज एका महिन्यात काढून देतो असे आमिष दाखवून ठाण्यामध्ये राहणाऱ्या आरोपीने नालासोपारा शहरात फसवल्याची घटना घडली असून फसवणूक झालेल्या डॉक्टरांनी तुळींज पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या डॉ. केदार शरद बक्षी (44) यांचे नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन विभागातील बिल्डिंग नंबर 37 मधील साई वाटिका इमारतीमधील दुकान नंबर ए/3 मध्ये साई स्माईल डेंटल केअर क्लिनिक आहे. 8 एप्रिल 2019 ते 13 एप्रिल 2019 च्या दरम्यान ठाणे येथील ओवळा परिसरात राहणाऱ्या महेश आल्हाद तारकर याच्या बरोबर गृकर्जावरून ओळख झाली होती. केदार यांची बहीण स्मिता संजय देवरुखकर यांना गृहकर्ज करून देतो असे बोलून केवायसी कागदपत्रे, बँक स्टेटमेंट, घराचे अग्रीमेंट कागदपत्रे, फोटो व इतर कागदपत्रे घेऊन आणि रोख रक्कम 1 लाख 86 हजार सातशे रुपये ऑनलाईन पद्धतीने घेऊन गृहकर्जही नाही व रोख रक्कमही परत केली नाही.