10 लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण,गर्भलिंग चाचणीचा आरोप करून उकळली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 07:32 PM2020-06-03T19:32:57+5:302020-06-03T19:33:32+5:30

हडपसर येथील घटना, खंडणी विरोधी पथकाने पोलिसांसह 4 जणांना घेतले ताब्यात..

Doctor kidnapped for Rs 10 lakh ransom | 10 लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण,गर्भलिंग चाचणीचा आरोप करून उकळली खंडणी

10 लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण,गर्भलिंग चाचणीचा आरोप करून उकळली खंडणी

googlenewsNext

पुणे : गर्भलिंग चाचणी केली जात असल्याचा आरोप करून हडपसर भागातील एका डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ७ जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रंजना वणवे (रा. बारामती), नाना फासगे, आरती चव्हाण, तिचा पती आणि दोन साथीदार अशा ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका पोलीस कर्मचार्‍यासह ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंंद्र मोहिते यांनी
सांगितले की, हडपसरमध्ये एका डॉक्टरांना खंडणी मागण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर आम्ही शोध घेऊन डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याना विश्वास दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. एका पोलीस कर्मचार्‍यांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. यातील रंजना वणवेही मुख्य सुत्रधार असून त्याच्यावर यापूर्वी ही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत फलटण भागातील एका ४८ वर्षांच्या डॉक्टरांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना २९ ते ३१ मे दरम्यान हडपसरमधील भेकराईनगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर स्त्रीरोगतज्ञ आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात काम करत आहेत. आरोपी आरती चव्हाणने काही दिवसांपूर्वी डॉक्टरांबरोबर संपर्क साधला. माझी तपासणी करायची आहे, असे तिने त्यांना सांगितले होते.
त्यानंतर चव्हाण कोंढवा भागातील खडी मशीन चौकात त्यांना भेटली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी चव्हाण हडपसर भागातील रुग्णालयात आली. ‘‘मला मुलगा हवा आहे. माझी गर्भलिंग निदान चाचणी करा,’’ असे तिने त्यांना सांगितले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तुम्ही गर्भवती नसल्याचे सांगितले. त्यानंतर चव्हाणने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चव्हाणचा पती रुग्णालयात आला. त्याने रुग्णालयाचा दरवाजा बंद केला.
तेवढ्यात चव्हाणबरोबर असलेले साथीदार तेथे आले. आम्ही पोलीस आहोत. तुम्ही गर्भलिंग निदान चाचणी करता. थोड्याच वेळात आमचे साहेब रुग्णालयात येऊन कारवाई करतील, असे सांगून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. आरडाओरडा केला तर जिवे मारू, अशी धमकी त्यांनी दिली. हे प्रकरण मिटवायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यांना सांगितले.
त्यानंतर फिर्यादी डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आणखी एका डॉक्टरला आरोपींनी धमकावून मोटारीत बसवले. मोटार सासवडकडे नेण्यात आली. तेथे एका ठिकाणी मोटार थांबविण्यात आली. एका दुकानात त्यांना डांबून ठेवण्यात आले.
आरोपींबरोबर असलेला साथीदार प्रदीप फासगे याने हे प्रकरण सात लाख रुपयांत मिटवून टाकू. पोलिसांकडे तक्रार करणार नाही, असे सांगितले. तक्रारदार डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी डॉक्टरांनी पैशांची जुळवाजुळव केली.आरोपींना ७ लाख रुपयांची खंडणी देऊन सुटका करून घेतली. याप्रकाराची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील,अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली.
त्यानंतर ते हडपसर परिसरात आले. चौकशीत रंजना वणवे, आरती चव्हाण आणि साथीदारांनी अशाच प्रकारचा गुन्हा काही दिवसांपूर्वी केल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Doctor kidnapped for Rs 10 lakh ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.