राजकारणापासून ते हॉटेलचालकांपर्यंत संबंधित कागदपत्रे ; रवींद्र बऱ्हाटेच्या घर झडतीत शेकडो फाईली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 08:24 PM2020-10-29T20:24:24+5:302020-10-29T20:46:02+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर ६ ठिकाणी छापे..
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर ६ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात राजकारणी व्यक्ती, पुणे, मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक, हॉटेल चालक, शासकीय ठेकेदारांसंबंधित शेकडो फाईली आढळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. तसेच कुलमुखत्यारपत्रे, खरेदीपत्रे, करारनामे, भागीदारीपत्रे व इतर दस्तऐवज याची कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहेत.
रवींद्र बऱ्हाटे हा गेल्या जुलै महिन्यांपासून फरार आहे. बऱ्हाटे याचा शोध घेण्यासाठी व घरझडतीसाठी ६ विशेष तपास पथके नेमण्यात आली. त्यांनी मधुसुधा अपार्टमेंट, लुल्लानगर ,धनकवडी, नुतनीकरण सुरु असलेला धनकवडीतील सरगम सोसायटीतील रायरी बंगला, त्यांची मुलगी चालवत असलेले ए झेड फार्मासिटीकल्स शॉप, धनकवडी, झांबरे इस्टेट, मुकुंदनगर, बहिणीचे घर भरतकुंज सोसायटी, एरंडवणा, मेव्हणाचे घर निशीदा सोसायटी, बिबवेवाडी अशा ६ ठिकाणी एकावेळी छापा घालण्यात आला.
रायरी बंगल्यात वेगवेगळ्या दस्तांच्या फाईल्स, माहिती अधिकारात केलेले अर्ज, माहिती अधिकारात प्राप्त केलेली कागदपत्रे, पुणे व मुंबई येथील नामांकित बांधकाम व्यावसायिक व शासकीय ठेकेदार यांच्याशी संबंधित कागदपत्रे, पुणे, पिंपरी महापालिका, महसुल विभाग कार्यालय, पी एम आर डी कार्यालय, वेगवेगळी तहसीलदार कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, इन्कमटॅक्स कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, वेगवेगळी ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्राप्त केलेल्या माहितीची कागदपत्रे तसेच वेगवेगळे राजकीय व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. या कागदपत्राची छाननी करण्याच्या कामासाठी ६ पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. याबाबत कोथरुड पोलीस अधिक तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले.
रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह ८ जणांवर कोथरुड पोलीस ठाण्यात ७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ८ आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून सध्या या गुन्ह्याचा पुरवणी तपास सुरु आहे.