पोलिसांच्या हातावर तुरी देत चोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:47 AM2019-11-25T02:47:57+5:302019-11-25T02:48:16+5:30

फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने रामनगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

Dombivali Crime news | पोलिसांच्या हातावर तुरी देत चोर पसार

पोलिसांच्या हातावर तुरी देत चोर पसार

Next

- सचिन सागरे

डोंबिवली - फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने रामनगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी, पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही एक सराईत चोरटा असाच पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. त्यालाही पोलिसांनी तासाभरात ताब्यात घेतले होते.

रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याने जगदीश वाघ याला पोलिसांनी कोठडीच्या बाहेर बसवले होते. वीज खंडित झाल्याने आपल्याला त्रास होत असल्याचे नाटक त्याने पोलिसांसमोर केले. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्याची तयारी पोलीस करीत होते. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत वाघ तेथून पसार झाला. पोलीस ठाण्याबाहेर पडताच वाघ याने रिक्षाने मित्राचे घर गाठले. त्याच्याकडून घेतलेल्या सुमारे १८ हजार रुपयांतून वाघ याने गोव्याच्या विमानाचे तिकीट बुक केले. त्यानंतर, एका टॅक्सीने विलेपार्ले येथील डोमेस्टिक विमानतळ गाठले. रामनगर पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली. गोव्याला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत विमानतळावर बसलेल्या वाघ याला दुपारी १ च्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी वाघ याच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.

चोरीच्या गुन्ह्यात सप्टेंबर २०१८ मध्ये लालबहादूर बाकीलाल यादव (१९, रा. पाथर्ली रोड) याला रामनगर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असताना यादव याने आपल्याला घाम येतोय, घाबरल्यासारखे होत आहे, असे सांगत मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी कोठडीतून बाहेर काढत त्याला पंख्याखाली बसवले. त्यावेळी पोलीस कर्मचारी कामात व्यस्त असल्याची संधी साधत यादवने पोलीस ठाण्यातून पळ काढला. त्यानंतर, स्टेशन परिसरातील एका दुकानात बिर्याणीवर ताव मारताना यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Dombivali Crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.