डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:08 AM2021-09-28T11:08:01+5:302021-09-28T11:08:30+5:30
सर्व आरोपी गजाआड : उद्या न्यायालयात पुन्हा हजर करणार
डोंबिवली : १५ वर्षीय पीडित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात ३३ जणांवर गुन्हे दाखल आहेत. रविवारपर्यंत ३१ नराधमांना पोलिसांनीअटक केली होती. त्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली, तर आणखी दोन फरार आरोपींचा शोध सुरू होता. या दोन्ही आरोपींना सोमवारी अटक केल्याने या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जेरबंद केले आहे.
तब्बल ३३ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. तक्रार दाखल होताच तत्काळ २३ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, तर उर्वरित १२ आरोपींचा शोध सुरू होता. शुक्रवारपर्यंत सहा जणांना जेरबंद केले, तर चार आरोपी फरार होते. चौघांनी मोबाइल स्वीच ऑफ होते. त्यामुळे आरोपींचे नातेवाईक आणि मित्रांवर पोलिसांनी वॉच ठेवला होता. त्यामुळे चारही आरोपींना अटक करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली.
सुनावणीकडे लागले लक्ष
नराधमांनी बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. दरम्यान, त्यातील काही व्हीडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती असून, काही आरोपींनी काही क्लिप्स मोबाइलमधून डिलीट केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे आरोपींचे मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडी वाढवून दिली जावी, अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यातील १९ आरोपींचे वकीलपत्र महिला वकील तृप्ती पाटील यांनी घेतले आहे. ते काय युक्तिवाद करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पीडितेला नेले होते घटनास्थळी
व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकरासह, मित्रांनी डोंबिवलीसह बदलापूर, रबाळे, मुरबाड या परिसरात पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून पीडितेला ज्या ठिकाणी बलात्काराचा प्रकार घडला त्याठिकाणी नेण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.