डोंबिवलीत अल्पवयीन मुली असुरक्षितच; एकीचा विनयभंग तर दुसरीचं अपहरण करीत विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:46 PM2021-09-27T17:46:29+5:302021-09-27T17:47:30+5:30
In Dombivli, minor girls are not safe :क्लासला जाते असे सांगून मुलगी सोमवारी घराबाहेर पडली होती. ती रात्रीपर्यंत घरी न आल्याने तीचा शोधाशोध घेण्यात आला.
डोंबिवली: एकिकडे सामुहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच दुसरीकडे अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन वेगवेगळया घडलेल्या घटनांमध्ये एका शिकवणी घेणा-या 15 वर्षीय मुलीचा अन्य मुलीच्या पालकाने विनयभंग केला तर इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका 13 वर्षीय फुस लावून तीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत राहणा-या एका 13 वर्षीय मुलीशी भिवंडीत राहणा-या एका तरूणाने इन्स्टाग्रामवर ओळख केली. पुढे चॅटींग करता करता तिच्याशी त्याची मैत्री झाली. अखेर तिला विश्वासात घेऊन तीला फूस लावली आणि तिचे अपहरण केले. दरम्यान याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिस निरिक्षक मोहन खंदारे, पोलिस उपनिरिक्षक घनश्याम बेंद्रे, सहायक पोलिस निरिक्षक गणोश वडणो यांच्या पथकाने कसोशीने तपास करीत या गुन्हयातील आरोपी अक्षय महाडिक याला अटक करीत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करीत तीला कुटुंबाच्या हवाली केले. क्लासला जाते असे सांगून मुलगी सोमवारी घराबाहेर पडली होती. ती रात्रीपर्यंत घरी न आल्याने तीचा शोधाशोध घेण्यात आला. पण तीचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने अखेर याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे तीचे अपहरण झाल्याची माहीती समोर आली. अक्षयला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. त्याने तिला त्याच्या भिवंडी येथील रहात्या घरात डांबून ठेवले होते. तेथून तीची सुटका करण्यात आली. त्याच्याविरोधात अपहरण, विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्या मोबाईलच्या माध्यमातून ती इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह होती. यातूनच तीची ओळख अक्षयशी झाली होती. सामुहिक बलात्कार प्रकरणातही सोशल मिडीयाचा वापर झाला आहे. त्यामुळे या मिडीयाचा चुकीच्या पध्दतीने वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
शिकवणी घेणाऱ्या मुलीचा विनयभंग
डोंबिवली पुर्वेतील शिकवणी घेणा-या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पप्पू सहानी याने विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अल्पवयीन मुलीकडे शिकायला येणा-या एका मुलीचा आरोपी हा बाप आहे. त्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेली असता पिडीत मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहीती मिळत आहे.