२४ कोटींचा चेक, बँक मॅनेजर अन् लुबाडणारी टोळी; डोंबिवली पोलिसांनी ८ जणांना पकडलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 04:39 PM2022-02-05T16:39:33+5:302022-02-05T16:40:26+5:30
इंडोस मोबाईल टॉवर कंपनीने २४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचाच हा चेक आहे असं बँक मॅनेजरला सांगितले.
कल्याण-एका बड्या मोबाईल टॉवर कंपनीचा २४ कोटीचा चेक बँकेत वटविण्यासाठी एक जण आला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने बँक मॅनेजरने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता देशभरात दहा कोटीचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
१ ऑक्टोबर २०२१ रोजी डोंबिवलीतील एचडीएफसी बँकेत हरीचंद्र कडवे हे २४ कोटींचा चेक घेऊन आले. वांगणीच्या संत रोहिदास सेवा संस्थेचे ते अध्यक्ष आहेत असे सांगून संस्थेला इंडोस मोबाईल टॉवर कंपनीने २४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचाच हा चेक आहे. बँकच्या क्लार्कला संशय आला. त्याने मॅनेजर विशाल व्यास याला सांगितले. त्यांनी कडवेला सीसीटीव्हीत पाहिले. त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी कडवेसह अन्य दोन जणांना अटक केले. तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला.
हरीचंद्रला २४ कोटीचा चेक मजहरने दिला होता. मजहरला हा चेक अनेक ओतारी याने दिला होता. अनेकला हा चेक फारूक उमरने दिला होता. फारुकला हा चेक सचिन साळसकर याने दिला होता अशी माहिती समोर येत असताना प्रत्येक जण दुसऱ्याचे नाव सांगत होते. मात्र साळसकरला हा चेक तयार करण्यास भावेश ढोलकिया याने सांगितले होते. भावेशला सचिन काही महिन्यापूर्वीच भेटला होता. सचिन हा कॉम्प्युटर मॅकेनिक आहे. तो कोणत्याही कंपनीचा बनावटी चेक छोलकिया याच्या सांगण्यावरुन तयार करीत होता. भावेश हा अशाच एका प्रकरणात गुजरातच्या जेलमध्ये होता. या टोळीने आत्तार्पयत देशभरात १० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
या प्रकरणात आत्तार्पयत हरीशचंद्र कडवे, नितीन दिलीप शेलार, अशोक बिहरीराम चौधरी, मजहर मोहम्मद हुसेन खान, उमर फारुक , सचिन साळसकर, अनेक अनिल ओतारी, भावेश लक्ष्मणभाई ढोलकिया या आठ जणांना अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या भावेश आहे. या टोळीने आणखीन किती जणांना गंडा घातला आहे याचा तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जे. डी. मोरे यांनी सांगितले.