Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवाला हत्येत राजकारण आणू नका, सीबीआय चौकशीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 08:16 PM2022-07-11T20:16:49+5:302022-07-11T21:26:50+5:30
Siddhu Moosewala : या न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, मात्र या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे राजकारण करू नये, असा सल्ला दिला आहे. गँगस्टर लॉरेन्स विश्नोईच्या वडिलांनी दाखल केलेल्या दोन याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. न्या. अजय रस्तोगी आणि अभय ओका यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत. अशा प्रकरणांमध्ये राजकीय पक्षांना स्थान नाही, असे आमचे मत आहे. कोण कोणत्या पक्षाचा आहे याने काही फरक पडत नाही. या न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, मात्र या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात सिद्धू मूसवाला यांच्यावर हल्ला झाला होता. त्याला गुन्हेगारांना घेरले आणि गोळीबार केला आणि गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यालाही आरोपी बनवले असून तो सध्या कोठडीत आहे. सिद्धू मुसेवाला हे देखील काँग्रेसचे नेते होते असून मुसेवाला यांची सुरक्षा इतर ४०० लोकांसह काढून घेण्यात आली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा अर्जही भाजप नेते जगजित सिंग यांनी दाखल केला होता. याशिवाय बिश्नोईचे वडील लविंदर सिंग यांनीही अर्ज केला होता.
या अर्जावर सुनावणी करताना खंडपीठाने सांगितले की, "पंजाब पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तुम्ही याचे राजकारण का करत आहात.' पंजाब सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर खून आणि खंडणीचे ५७ गुन्हे दाखल आहेत. यानंतरही पंजाब पोलिसांना मिळालेल्या अटक वॉरंटला त्याच्या वडिलांनी आव्हान दिले आहे. सिंघवी म्हणाले, 'आमच्याकडे माहिती आहे की, तो आंतरराष्ट्रीय शूटर्सच्या संपर्कात होता. जेणेकरून मुसेवाला मारला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही त्याला कोठडीत ठेवू इच्छितो.
लॉरेन्स बिश्नोईच्या वडिलांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, माझ्या मुलाला कोठडीत धोका आहे आणि पोलिस त्याचा एन्काउंटर करू शकतात. माझ्या मुलाच्या सुरक्षेला धोका असल्याचे लविंदर सिंग यांनी न्यायालयात सांगितले. त्याला अमृतसरला नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाने त्याच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी.