“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 02:43 PM2020-08-08T14:43:01+5:302020-08-08T14:47:10+5:30
मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे.
मुंबई – सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूपूर्वी दिशा सालियान हिचा ९ जूनला मृत्यू झाला होता. दिशा ही सुशांतची एक्स मॅनेजर होती. १४ जूनला सुशांतच्या मृत्यूनंतर आता सोशल मीडियात या प्रकरणात विविध आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काही नेत्यांनी सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यू प्रकरणाला एकमेकांशी जोडलं आहे. तर या दोन्ही प्रकरणाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी काहीही विधान केले नव्हते मात्र आता त्यांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत या संपूर्ण प्रकारावर भाष्य केले आहे. माझ्या मुलीला बदनाम करुन फायदा उचलू नका, तिच्या मृत्यूशी खेळू नका, ती आमची एकुलती एक मुलगी होती. आम्ही आमच्या मुलीला गमावलं आहे. आता जे लोक तिची प्रतिमा मलिन करत आहेत ते आमची छळवणूक करुन संपवून टाकत आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
दिशाची आई म्हणाली की, सर्वात आधी मी देशातील लोकांशी, मीडियाशी, सोशल मीडियातील लोकांना सांगते हे सर्व चुकीचं आहे. सर्व बातम्या खोट्या आणि अफवा आहेत. मी माझ्या मुलीला गमावलं आहे पण आता अशाप्रकारच्या चर्चा आम्हालाही मारुन टाकतील. सुप्रीम कोर्टाने या सर्व चर्चांना थांबवले पाहिजे. आम्ही खूप पीडित आहोत. आता आमच्या मुलीबद्दल खोटं ऐकण्याची ताकद आमच्यात नाही अशी विनवणी केली आहे.
दिशावर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे असा आरोप केला जात आहे. हे सर्व चुकीचं आहे. आम्ही दोनदा पोलिसांना जबाब दिला आहे. मालवणी पोलिसांकडे याचा रेकॉर्ड आहे. आम्ही पोस्टमोर्टम रिपोर्ट पाहिला आहे. मुंबई पोलीस योग्यरितीने काम करत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे.
तसेच दिशा आणि रोहन रॉय यांच्या संबंधाबद्दल दिशाच्या आईने सांगितले की, लॉकडाऊननंतर ते दोघंही लग्न करणार होते, संपूर्ण लॉकडाऊन रोहन आमच्यासोबत होता. ४ जून रोजी रोहनला एक ऑफर मिळाली, मालाड येथील हाऊस लोकेशनवर शूट फायनल केले, त्यासाठी दिशा आणि रोहन त्याठिकाणी गेले होते. रोहनला त्या कामासाठी चेकही मिळाला होता. लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हतं त्यामुळे या ऑफरमुळे दोघंही आनंदात होते. लॉकडाऊनमध्ये दिशा घरीच होती, तिला बाहेर जाण्याची संधी मिळाली असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, आम्हाला कोणावरही शंका नाही, त्या रात्री तिच्यासोबत खूप जवळचे मित्र होते, तिचा एक मित्र भावासारखा होता. शाळेपासून त्यांची मैत्री होती, ती त्याला राखी बांधत होती. नेत्यांचे आरोप ऐकले तर खूप राग येतो, दिशाचे कोणासोबतही संबंध नव्हते. ज्यांचे नाव घेतले जात आहे, त्यांना ती भेटलीही नाही. त्यांचे नंबरही तिच्याकडे नव्हते. फोटो नाहीत. सुशांत प्रकरणात माझ्या मुलीला ओढलं जात आहे. आम्ही या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करु शकतो पण आम्ही केलं नाही,कारण माझ्या मुलीची प्रतिमा मलीन होईल. हे लोक आम्हाला जगू देणार नाहीत असंही तिच्या आई-वडिलांनी सांगितले.