उद्योगविश्वात खळबळ उडविणारी बातमी! टेक फर्मच्या CEO, MD ची निर्घृण हत्या; माजी कर्मचाऱ्यानं तलवारीनं केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 09:37 PM2023-07-11T21:37:28+5:302023-07-11T21:39:57+5:30
या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीचे नाव फेलिक्स असल्याचे बोलले जात आहे. तो एरोनिक्सचा माजी कर्मचारी होता...
बेंगळुरूमधून मंगळवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका टेक फर्मच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (CEO) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतांची ओळख फणींद्र सुब्रमण्यम (MD) आणि वीनू कुमार (CEO) अशी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक माजी कर्मचाऱ्याने केबिनमध्ये शिरून तलवारीने हल्ला करत दोघांचीही हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीचे नाव फेलिक्स असल्याचे बोलले जात आहे. तो एरोनिक्सचा माजी कर्मचारी होता. प्राथमिक माहितीनुसार, फेलिक्सने कंपनी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्याच्या या व्यवसायात संबंधित दोघेही कथितपणे अडथळा आणत होते. यामुळे फेलिक्स संतापला होता. यामुळे तो मंगळवारी रागाच्या भरात तलवार घेऊन कंपनीच्या कार्यालयात शिरला आणि फणींद्र तसेच वीनू यांच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला.
नेमकं काय घडलं? -
मिळालेल्या माहितीनुसार, फणींद्र आणि वीनू हे दोघेही कार्यालयात होते. फेलिक्सने फणींद्र आणि वीनू कुमार यांच्यावर अत्यंत सावध पणे संपूर्ण प्लॅनिंगसह हल्ला केला. आज सायंकाळी साधारणपणे 4 वाजण्याच्या सुमारास संतापलेला फेलिक्स तलवार आणि चाकू घेऊन एरोनिक्सच्या कार्यालयात पोहोचला आणि त्याने या दोघांवर थेट हल्ला चढवला. यानंतर, फणींद्र आणि वीनू यांनी बचावाचा आणि तेथून पळ काढण्याचाही पूर्ण प्रयत्न केला. मात्र फेलिक्सने त्यांना घेरून संपवले.
फेलिक्स कार्यालयात शिरताच कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्येनंतर, पोलिसांना कॉल करण्यात आला होता. नॉर्थ ईस्ट बेंगळुरूचे डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, एरोनिक्स इंटरनेट कंपनीचे एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वीनू कुमार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हल्लेखोर फरार झाला आहे. पोलीस शोधात लागले आहेत. हत्येतील आरोपी फेलिक्स टिक टॉक आणि रील्स व्हिडिओ बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे.